गेल्या आठवड्यापासून शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून, यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे विविध कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहे. तसेच या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करून, शाळा-महाविद्यालये ६ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थांची संख्या जास्त असल्यामुळे जळगाव आगार प्रशासनातर्फे सकाळपासून संबंधित गावांना बसेस सोडण्यात येत होत्या. ज्या गावांना वेळापत्रकानुसार दिवसभरात
दहा ते बारा फेऱ्या आहेत, त्यातील निम्म्या फेऱ्या या विद्यार्थांसाठीच सोडण्यात येत आहेत. मात्र, आता शाळा बंद असल्यामुळे आगार प्रशासनातर्फे बहुतांश गावांच्या फेऱ्या निम्म्यावर केल्याचे सांगण्यात आले. तर स्थानकात ज्या गावांना प्रवाशांचा प्रतिसाद जास्त असेल, त्या गावांना जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचे स्थानक प्रमुख मनोज तिवारी यांनी सांगितले.