चाळीसगावच्या खाडे परिवाराच्या हाती तीन पिढ्यांपासून 'कॅमेरा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 05:57 PM2020-08-18T17:57:14+5:302020-08-18T18:05:23+5:30
एकत्र कुटूंब पद्धतीत जोपासला जातोय व्यवसाय चाळीसगाव, वडिलांचा चाळीसगाव व कोपरगावला डाळ व्यवसाय. तथापि तरुण वयातल्या आनंदराव मोतीराम ...
एकत्र कुटूंब पद्धतीत जोपासला जातोय व्यवसाय
चाळीसगाव,
वडिलांचा चाळीसगाव व कोपरगावला डाळ व्यवसाय. तथापि तरुण वयातल्या आनंदराव मोतीराम खाडे यांचा ओढा कलेकडे होता. त्यांनी कोपरगावला सहज एका चित्रकला स्पर्धेत सहभाग घेत महात्मा गांधींचे पोट्रेट चितारले. त्याला पहिले बक्षिस मिळाले. त्याच दरम्यान एका छायाचित्रकाराकडे फोटोग्राफी शिकण्यासाठी आनंदराव जाऊ लागले. पुढे त्यांनीच कॕमेरा हाती घेतला. सद्यस्थितीत त्यांचा नातू कमलेश खाडे याच्या हाती तो आहे. गेली सात दशके खाडे कुटूंबिय एकत्र असून त्यांच्या फोटोग्राफीच्या व्यवसायाची क्लिक ७० वर्षीय झाली आहे. फोटोग्राफी दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी खाडे कुटूंबियांनी 'लोकमत'शी बोलतांना आठवणींना उजाळा दिला.
औरंगाबाद रस्त्यावर छाजेड अॉईल मीलच्या परिसरात आनंदराव खाडे यांनी फोटो स्टुडिओ थाटला. सुरुवातीला त्यांच्या सोबत त्यांचे पुतणे देविदाम शिवराम खाडे असत. ८२ वर्षीय शिवराम खाडे यांनी तीन पिढ्यांपासून जोपासलेल्या फोटोग्राफी व्यवसायाच्या अनेकविध आठवणींचा पटच कॕमे-यातील रिळाप्रमाणे उलगडून दाखवला. २००३ मध्ये आनंदरावांचे निधन झाल्यानंतर ३१ वर्षीय कमलेश गोपाळराव खाडे यांनी व्यवसायाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यांचे वडिल ५९ वर्षीय गोपाळराव खाडे हेही मदतीला असतात.
अट होती...कोपरगावात व्यवसाय करायचा नाही
आनंदराव खाडे कोपरगावात छायाचित्र कला शिकले. मात्र त्यांना फोटोग्राफी शिकवणा-या फोटोग्राफरने कोपरगाव मध्ये स्टुडिओ न टाकण्याच्या बोलीवर त्यांना फोटोग्राफीचे धडे दिले. १९५६ मध्ये आनंदराव चाळीसगावी आले. त्यांनी चौधरी गल्लीत स्टुडिओ उभारला. फोटोग्राफीला सुरुवात केली. तो ब्लॕक अॕण्ड व्हाईटचा जमाना होता. त्यामुळे फोटोग्राफी जिकरीचे आणि कौशल्याचे काम होते. रोल धुण्याचे तंत्रही त्यांना अवडत होते.
पहिली आऊटडोर फोटोग्राफी उंबरखेडला
आनंदरावांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पुतणे देविदास यांनी कॕमेरा हाती घेतला होता. १९६० मध्ये उंबरखेडला तत्कालिन शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाची पहिली आऊटडोअर फोटोग्राफी देविदास खाडे यांनी केली.
देविदास खाडे यांनी आजही गेल्या ७० वर्षात स्टुडिओ घेतलेले प्रत्येक साहित्य जपून ठेवले आहे. त्यांच्या संग्रही फिल्डसह बारा बाय दहा, सहा बाय चार, वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्स अशा एका युगाच्या साक्षीदार असणा-या अनेक वस्तू आहे. पूर्वी ग्रुप फोटोसाठी फिल्ड कॕमेरा वापरला जायचा. शाळांसह रोटरी क्लबसाठी अशी फोटोग्राफी केल्याची आठवणही देविदास खाडे यांनी जागवली. १९६० पासून खरेदी केलेल्या वस्तू, जुने कॕमेरा रोल असा लवाजमा त्यांनी ठेवा म्हणून जतन केला आहे.
डिजिटल युगात व्यवसायाला उतरती कळा
सद्यस्थितीत टाळेबंदीमुळे गेल्या चार महिन्यांपासून स्टुडिओला कुलूपच आहे. डिजिटल युगात मोबाईमुळे फोटोग्राफर जणू हद्दपार झाला आहे. साधे वाढदिवसाचे फोटो काढण्यासाठी बोलावले जात नाही. अशी खंत कमलेश यांनी व्यक्त केली. फोटोग्राफी व्यवसायाला लागलेली उतरती कळा पाहून कमलेश यांनी मेडीकल दुकान हा नवा व्यवसायही सुरु केला आहे. मात्र अधुनमधून ते वडिलांसोबत फोटोग्राफीचे कामही आवर्जून करतात.