भुसावळ व बांभोरी येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 01:51 PM2020-04-12T13:51:03+5:302020-04-12T13:51:34+5:30
दोन दिवसात चार परवाने रद्द : वाढत्या तक्रारींमुळे कारवाईचा धडाका
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लाभार्थ्यांना धान्य न देणे, दुकानात फलक नसणे, धान्य साठ्यात तफावत अशा वेगवेगळ््या कारणांनी भुसावळ व धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील स्वस्त धान्य दुकानांचे परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी रद्द केले. स्वस्त धान्य दुकानांच्या तक्रारी वाढतच असल्याने कारवाईंचा धडाका लावून दोन दिवसात चार दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. भुसावळ येथील स्वस्त धान्य दुकानाच्या बाबतीत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते, त्यानंतर तेथे तपासणी करण्यात आली.
भुसावळ येथील जुना सातारा, कडू प्लॉट भागातील एस.बी. लोखंडे यांचे स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२ या दुकानांबाबत तक्रारी वाढत असल्याने या संदर्भात ‘लोकमत’ने ५ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केले होते, त्यानंतर तेथे तपासणी करण्यात आली. त्या वेळी तेथे आवश्यक ते फलक नसणे, परवाना अद्यायावत केलेला नाही, शिल्लक धान्य साठ्यात तफावत अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे या दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी दिले.
या सोबतच धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथील स्वस्त धान्य दुकानदार गुलाब हिरालाल फुलझाडे हे धान्य वितरीत करीत नाही, ठरवून दलेल्या दरापेक्षा जास्त दराने धान्य देतात, लाभार्थ्यांशी अरेरावी, पावती देत नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगची व्यवस्था केलेली नाही, दप्तरात अनियमितता, महिन्यातील काही दिवसच दुकान उघडे ठेवले जाते, अशा वेगवेगळ््या तक्रारी आल्याने सदर दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला.
दोन दिवसात चार परवाने रद्द
जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांच्या तक्रारी वाढतच असल्याने कारवाईंचा धडाका लावून दोन दिवसात चार दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. यामध्ये शुक्रवार, १० एप्रिल रोजी रावेर तालुक्याकील सावदा येथील व अमळनेर तालुक्यातील दापोरी बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द झाल्यानंतर दुसºया दिवशी शनिवार, ११ एप्रिल रोजी भुसावळ व धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले.