शासनाच्या कार्यक्रमांवर केटर्सचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 12:11 AM2020-10-19T00:11:08+5:302020-10-19T00:12:56+5:30
कोरोनाच्या काळात केटर्स, आचारी , मंगल कार्यालय चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पारोळा : कोरोनाच्या काळात केटर्स, आचारी , मंगल कार्यालय चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने ५०० लोकांची परवानगी न दिल्यास २ नोव्हेंबर रोजी राज्यभर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शासनाच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पारोळा येथील भाटेवाडीत झालेल्या मंडप, आचारी, मंगल कार्यालय असोसिएशनच्या बैठकप्रसंगी जळगाव जिल्हा टेंट आणि डेकोरेशन असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप श्रीश्रीमाळ यांनी ही माहिती दिली.
श्रद्धांजलीनंतर दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रितेश चोरडिया, सल्लागार शंकर डायरा, लाइटिंग असोसिएशनचे अध्यक्ष संतोष दप्तरे, कोषाध्यक्ष अजय अग्रवाल उपस्थित होते.
या कोरोना काळात व्यवसायिकांची दशा कशी झाली आहे आणि त्या परिस्थितीला दिशा कशी द्यायची याबाबत प्रितेश चोरडीया यांनी माहिती दिली. तर संतोष दप्तरे यांनी व्यवसाय करताना कोणाही व्यावसायिकाला अडचणी आल्यात तर असोसिएशनकडे आपले रडगाणे मांडू शकतात, आम्ही आपल्या मागण्यांसाठी निवेदन द्यायला गेले असताना तेथील अधिकाऱ्यांनी कोरोनावर काय तुम्हाला लस सापडली आहे का, असा सवाल केला होता.
सूत्रसंचालन जगदीश शर्मा यांनी तर आभार बापू कुंभार यांनी मानले. यशस्वीतेसाठी बंडू शिंपी, दीपक शिंपी, संजय पवार, भोला भावसार, संजय चौधरी, भाऊसाहेब पाटील, गोपाल साळी आदींनी परिश्रम घेतले.