जळगाव : ऑनलाइन खरेदीच्या वेळी फसवणूक होण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. ग्राहकांनी याबाबत अधिक खबरदारी घ्यावी. कुठल्याही ऑनलाइन लिंकवर खात्री करूनच क्लिक करावे. लॉटरी किंवा बक्षीस मिळाल्याचे प्रलोभन दाखवून ग्राहकांना अनोळखी लिंक देऊन जाळ्यात ओढले जाते. कुठलीही बँक ग्राहकांना ओटीपीसाठी फोन करीत नसते. तेव्हा ग्राहकांनी ऑनलाइन व्यवहार करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
जागतिक ग्राहक दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइन जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, साहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते. तर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी आणि सदस्य हे ऑनलाइन उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी जागतिक ग्राहक दिनाचे वैशिष्ट्य सांगून ग्राहक ही संकल्पना केवळ स्थानिक नसून वैश्विक असल्याने जगभरात ग्राहक संरक्षण, ग्राहकांचे हक्क अबाधित राखणे याबाबत जनजागृती आणि प्रबोधन करणे सुरू असते तसेच ग्राहक दिनाच्या माध्यमातून याबाबत ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सांगितले. ग्राहक आयोगात दाखल करावयाच्या तक्रारीच्या खर्च मर्यादेत झालेली वाढ, ऑनलाइन फसवणूक झाल्यास करता येणारी तक्रार, ऑनलाइन तक्रार दाखल करणे आणि ऑनलाइन सुनावणी याबाबत त्यांनी तपशीलवार माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमती मनोरे यांनी तर आभार रेखा सावंत यांनी मानले.