बांधकाम बहुजन वंचित आघाडीने पाडले बंद
भुसावळ : येथे तापी नदीच्या काठी स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम आमदार निधीतून सुरू आहे. परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, अशी माहिती मिळताच वंचित बहुजन युवा आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी सहकाऱ्यांसमवेत स्मशानभूमी येथे जात पाहणी केली. या कामासाठी निकृष्ट दर्जाची मातीमिश्रित वाळू वापरत असल्याचे लक्षात येताच, ठेकेदारास तात्काळ सुरू असलेले काम बंद करण्यास भाग पाडले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता पी.यू. ठाकूर यांनी स्मशानभूमी येथे भेट देऊन कामाची पाहणी केली तसेच ठेकेदार वापरत असलेली वाळू निकृष्ट असल्याचे मान्य केले असल्याचे सांगण्यात आले. संबंधितांवर याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपमुख्य अभियंता यांचेकडे करण्यात आली आहे. कारवाई होत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आघाडीने घेतलेला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे रुपेश साळुंके, बबन कांबळे, तालुका महासचिव प्रल्हाद घारू, विशाल घायतडक, आकाश वानखेडे, आकाश जाधव आदी उपस्थित होते. कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रशासनास दिला आहे.
संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू असताना त्यात निकृष्ट दर्जाची रेती व सिमेंट वापरत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देताना बहुजन वंचित आघाडीचे पदाधिकारी.