लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र सरकारने प्रस्ताव मागविल्यानुसार तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला मंजुरी देऊन त्याच्या फाउंडेशनचे कामही निम्म्यावर आले आहे. ३० जूनपर्यंत हा प्रकल्प उभा राहणार असून, त्यातून दिवसाला २०० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. अगदी तातडीने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प होत आहे. प्रशासनाकडून मंजूर प्रकल्पाची निविदाप्रक्रिया सुरू असून, सोमवारी या निविदा उघडून सर्वात कमी निविदेला तातडीने वर्कऑर्डर देण्यात येणार आहे. दरम्यान, या दोन प्रकल्पांमुळे लिक्विड ऑक्सिजनची मागणी कमी होणार असून, पुढील लाटेसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे यंत्रणेचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला एक गुगुल शिट पाठवून मागणी नोंदविण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार जळगाव जीएमसीने तातडीने ही गुगल शिट भरून पाठविली. तातडीने मंजुरी मिळून केंद्राकडून या फाउंडेशनचे कामही सुरू करण्यात आले आहे. ऑक्सिजन टँकच्या मागील बाजूस, औषधशास्त्र विभागाच्या समोर हा प्रकल्प उभा राहत आहे. या ठिकाणी मजूरही असून युद्धपातळीवर हे काम सुरू आहे. फाउंडेशन झाल्यानंतर या ठिकाणी मशिनरी आणली जाणार असून, हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा हा प्रकल्प ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे केंद्राचे टार्गेट असल्याची माहिती ऑक्सिजन समितीचे प्रमुख डॉ. संदीप पटेल यांनी दिली.
सध्या मागणी निम्म्यावर
रुग्णसंख्या घटल्याने लिक्विड ऑक्सिजनची मागणी ही ४ मेट्रिक टनवर येऊन ठेपली आहे. आधी दिवसाला ८ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन लागत होते. आता प्रशासनावरील ताण हलका झाला असून, एकदा १६ टन लिक्विड भरल्यानंतर चार दिवस त्यातून ऑक्सिजनच पुरवठा केला जात असल्याने आणीबाणीची स्थिती नसल्याचे चित्र आहे. मुख्य इमारतीत आता १२८ रुग्ण दाखल आहेत.
असे आहेत प्रकल्प
केंद्राकडून मंजूर प्रकल्प : १ हजार लिटर प्रतिमिनिट, २०० जम्बो सिलिंडर दिवसाला
प्रशासनकडून मंजूर प्रकल्प : १३५५ लिटर प्रतिमिनिट, २७५ ते ३०० जम्बो सिलिंडर दिवसाला