चाळीसगाव : येथील पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांची अहमदनगर येथे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पदोन्नत्तीवर बदली झाली असून, ते शुक्रवारी रुजूही झाले आहे. पालिकेत पुन्हा सहा महिन्यातच ‘प्रभारीराज’ आले आहे. अनिकेत मानोरकर यांची पंढरपूर पालिकेत बदली झाल्यानंतर चाळीसगाव पालिकेला दीड वर्ष पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले नाही. कधी भडगाव पालिकेचे मुख्याधिकारी विकास नव्हाळे, तर कधी चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांनी प्रभारी म्हणून पालिकेचा गाडा हाकला.सहा महिन्यापूर्वी १३ अॉगस्ट रोजी शंकर गोरे हे मुख्याधिकारी म्हणून चाळीसगाव पालिकेत रुजू झाले होते. त्यांनी यापूर्वीही येथे सेवा बजावलेली होती. सद्य:स्थितीत शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने पालिकेच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होतो. प्रशासकीयदृष्ट्यादेखील अनेक कामांना ब्रेक लागतो. सहाच महिन्यात मुख्याधिका-यांना बदलीचा खो मिळाल्याने पालिकेच्या वर्तुळात नाराजीचा सूर उमटला आहे. सद्य:स्थितीत पालिकेच्या राजकीय वर्तुळात नाट्यमय घडामोडी घडत असून विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये शह-काटशह सुरू होत आहे. शहरातील सुविधांबाबत नाराजीची तक्रार असतानाच मुख्याधिका-यांचीही बदली झाली आहे. भडगाव पालिकेचे मुख्याधिकारी विकास नव्हाळे यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. विद्यमान सदस्यांच्या सत्ताकाळाचे काही महिने शिल्लक राहिले आहेत. वर्षअखेरीस पालिकेची निवडणूकही असल्याने विकासाची कामे त्वरीत मार्गी लागावीत, अशी शहरवासियांची अपेक्षा आहे. लवकरच शासनस्तरावर पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावे. याची मागणी करणार असल्याचे नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी 'लोकमत'ला सांगितले.
चाळीसगाव पालिकेच्या मुख्याधिका-यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 5:10 PM
चाळीसगाव पालिकेत पुन्हा सहा महिन्यातच ‘प्रभारीराज’ आले आहे.
ठळक मुद्देसहा महिन्यातच पुन्हा ‘प्रभारीराज’दीड वर्षानंतर मिळाले होते पूर्णवेळ मुख्याधिकारी