७२७ वर्षांची परंपरा असणारा चाळीसगावचा बामोशी बाबा उरुस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 07:06 PM2018-03-30T19:06:17+5:302018-03-30T19:06:17+5:30
तीन दिवसांच्या मुख्य उरुस दरम्यान तलवार मिरवणुकीस लोटतो भाविकांचा जनसागर
जिजाबराव वाघ/आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, दि : २८ : हजरत पीर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबांच्या सर्वधर्मीय उरुसाचे यंदाचे हे ७२८ वे वर्ष आहे. तीन दिवसीय मुख्य उत्सवाला शनिवार ३१ पासून सुरुवात होत आहे. पोलीस प्रशासनाने नुकताच परिसराचा आढावा घेऊन सुरक्षेसाठी तयारी पूर्ण केली आहे.
समाधीचे दुधाने स्नान
तीन दिवस चालणाऱ्या उरुस यात्रोत्सवाची सुरुवात बामोशी बाबांच्या समाधीच्या स्नानाने होते. ३१ रोजी रात्री बारानंतर पहाटे चार पर्यंत दुध, गुलाबपाणी, सुगंधी अत्तराने कबरीचे शाही स्नान केले जाते.
चला चला 'कादरी' का संदल
उत्सवाच्या दुस-या दिवशी संदल मिरवणुक निघते. यावर्षी १ एप्रिल रोजी रथगल्लीतील तमीजोद्दीन शेख यांच्या घरुन परंपरेप्रमाणे सायंकाळी पाच वाजता संदल मिरवणुक निघेल. ही मिरवणुक वाजत - गाजत रात्री साडे नऊ वाजता बाबांच्या समाधीस्थळी पोहचते. यावेळी मिरवणुक वाजत - गाजत आणलेले संदल (चंदन) अर्पण केले जाते. मानाची चादर कबरीवर टाकण्यात येते.
तलवार मिरवणुक आणि भक्तिभाव
भालचंद्र भास्करराव देशमुख हे तलवार भुवनचे संस्थापक व प्रमुख आहेत. गेल्या ७२७ वर्षांपासून याठिकाणावरून तलवारीची भव्य मिरवणुक निघते. यंदा ही मिरवणुक २ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता निघणार आहे. हिरव्या चुडीचादरीत गुंडाळलेली तलवार, भगवा फेटा आणि टिळा लावलेला देशमुख कुमार धरतो. मिरवणुकीत सर्वधर्मीय भाविक सहभागी होतात. राष्ट्रीय एकात्मतेचे हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते. बँण्डची सुरावट, ढोल पथकाचे गगनभेदी ताल, हजारो मुखातून बाबांचा होणार गजर, वाटेत ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी...अशा वातावरणात ही मिरवणुक पुढे सरकते. रात्री नऊ वाजता बाबांच्या समाधीस्थळी तलवारीचा मुक्काम असतो.
काय आहे अख्यायिका
पीर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबांच्या चाळीसगाव शहरातील वास्तव्याबाबत वेगवेगळ्या अख्यायिका असल्या तरी ते आठव्या शतकातील सुफी संत म्हणून परिचित आहेत. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी वेगवेगळे चत्मकारही करुन दाखविले. अवलिया संतांसारखी त्यांची दिनचर्या होती. रंजल्या - गांजल्या लोकांची दु:खे दूर करण्यात त्यांना आत्मानंद वाटत असे. शहराच्या नैऋत्य दिशेला डोंगरी नदीच्या किनारी त्यांची समाधी असून येथेच दर्गाह उभारण्यात आला आहे. बाबांनीच आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ असणारी तलवार भालचंद्र देशमुख यांना सुपूर्द केली. तलवार मिरवणुकीत धुनी धरण्याचा मान चाळीसगावचे पोलीस पाटील स्व. वसंतराव भास्करराव देशमुख यांच्या कुटूंबियांकडे आहे.
चादर, शिरणी आणि न्याज
चाळीसगाव पंचक्रोशीतून अनेक भाविक बाबांच्या समाधीवर 'चादर' चढवतात. चादरीसोबत गोड शिरणी, न्याज (गोड भात) अशी सवाद्य मिरवणुक काढली जाते. बाबांच्या समाधीवर टाकण्यात येणारी चादर मुंबई, पुणे, बुलढाणा येथून येते. चादरीवर कुराण मधील 'आयते सुरह' लिहिले असतात. उरुस पर्वणीत चादर सेवा विशेष मानली जाते. सर्वधर्मीय लोक चादर चढवितात.