चाळीसगावची ‘कृषी नवदुर्गा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 03:05 PM2020-10-16T15:05:09+5:302020-10-16T15:07:08+5:30
'ती' मात्र नव्या जोमाने स्वमालकीच्या शेतीमातीत पाय रोवून उभी राहिली आणि अवघ्या पाच वर्षात जमिनीच्या तुकड्याचा कायापालटच केला.
चाळीसगाव : नोकरी मिळत नसल्याने पतीला अपयश आलेले. 'ती' मात्र नव्या जोमाने स्वमालकीच्या शेतीमातीत पाय रोवून उभी राहिली आणि अवघ्या पाच वर्षात जमिनीच्या तुकड्याचा कायापालटच केला. चार एकर क्षेत्रात शारदा समाधान ठुबे यांनी विषमुक्त झिरोबजेट शेती फुलवली असून, एकरी ७० हजारांचे त्या उत्पन्न घेत आहेत. परिस्थिती आणि रासायनिक शेतीला हरवत शारदा ठुबे हिरव्यागार रंगातल्या ‘कृषी नवदुर्गा’ ठरल्या आहेत.
समाधान ठुबे हे पदवीधर. हस्ताक्षर चांगले असल्याने त्यांनी काहीकाळ पेंटर म्हणूनही काम केले. शैक्षणिक कागदपत्रे पुढे करून त्यांनी नोकरीचा पाठलाग केला. मात्र त्यांना अपयश आले. उपजीविकेसाठी काही तरी करावे म्हणून स्वमालकीच्या शेतीची वाट धरली. शारदादेखील त्यांच्यासोबत पाय रोवून उभ्या राहिल्या. या दाम्पत्याने पिंपरखेड शिवारातील आपल्या शेतीला हिरवेगार रुपडे दिले असून चार एकरात विषमुक्त नैसर्गिक शेतीचा नवा पॅटर्न निर्माण केला आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाला व धान्याला मोठी मागणी आहे. काळ्या मातीच्या उदरात हिरवं सोनं असत. त्यासाठी श्रमाचे सिंचन हवे असते, असं सांगताना ठुबे दाम्पत्याचा ऊर भरुन येतो.
‘ती’चे कठोर परिश्रम
ठुबे दाम्पत्य हे मेहनती आहे. त्यांना दोन्ही मुली आहेत. समाधान ठुबे यांनी विषमुक्त झिरोबजेट शेतीचा प्रयोग राबविला आहे. गत १० वर्षात त्याला यशाची फळे लागली आहे.
विनाखर्च शेती असल्याने सर्व कामे शारदा ठुबे स्वत:च करतात. निंदणी, भाजीपाला लावणे, टोपणी, पिकलेले उत्पन्न काढणे, त्याचे पॅकींग करणे. इथपर्यंतची कामे करताना त्या कुणाचीही मदत घेत नाही.
उत्पादित भाजीपाला व धान्य पॅकींग करुन समाधान ठुबे चाळीसगाव शहर परिसरात घरपोच विकतात.
शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते ठुबे दाम्पत्य स्वत:च तयार करतात. त्यांना यासाठी कोणताही इतर आर्थिक खर्च करावा लागत नाही. त्यांचे हे झीरो बजेट शेती मॉडेल शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरले आहे.
एकरी ७० हजाराची ‘धनलक्ष्मी’
शारदा ठुबे यांची कठोर मेहनत त्यांच्या कुटुंंबासाठी धनलक्ष्मी ठरली आहे. त्यांनी १० वर्षात परिस्थितीचा वध करीत आपण कृषी नवदुर्गा आहोत हेच अधोरेखित केले आहे. एकूण चारपैकी प्रत्येकी एक एकरात लागवड केली जाते. त्यांना एकरी ७० हजार रुपये मिळतात. कुठलाही अन्य खर्च नसल्याने चार एकरात अडीच लाखाचे उत्पन्न मिळते. शारदा आणि समाधान यांच्या 'मॉडेल' शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातील शेतकरी व अभ्यासकही येथे येत असतात.
एक महिला पदर खोचून पाय रोवून उभी राहिली की, कुटुंबाचा आधारवड कशी ठरते. याचे शारदा ठुबे मूर्तिमंंत प्रतिकच ठरतात. यंदाच्या नवरात्रोत्सवातील त्या कृषी नवदुर्गाच आहेत.
पती समाधान यांनी विषमुक्त झिरो बजेट शेतीचा पर्याय समोर ठेवल्यानंतर मी त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. शेतीची सर्व मी करायची. समाधान यांनी उत्पादित मालाच्या विक्रीचे काम सांभाळायचे. संसाराचा गाडा आम्ही असा ओढतोय. १० वर्षात काळ्या आईने आम्हाला भरभरुन दिले. विषमुक्त शेती उत्पादन घेत आहोत. याचेही मोठे समाधान आहे.
- शारदा समाधान ठुबे, महिला शेतकरी, चाळीसगाव