चोपडा : लोकसंख्या आणि ग्रामपंचायत सदस्य संख्येच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असलेल्या चहार्डी ता.चोपडा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया अतिशय चुरशीत पार पडली. गुप्त मतदान प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या चंद्रकलाबाई दत्तात्रय पाटील यांची सरपंचपदी निवड झाली. त्यांना सतरापैकी नऊ मते मिळाली तर उपसरपंचपदी तुळशीराम धनराज कोळी यांची निवड झालेली आहे. त्यांनाही नऊ मते मिळाली. चहार्डी येथे सतरापैकी एका गटात नऊ सदस्य तर दुसऱ्या गटात आठ सदस्य अशी स्थिती निर्माण झाली असताना आठ सदस्य असलेल्या गटाच्या चंद्रकलाबाई दत्तात्रय पाटील यांनी नऊ सदस्य असलेल्या गटातून एक सदस्य फोडल्याने सरपंच पदासाठी नऊ मते घेऊन ते विजयी झाल्या, तर नऊ सदस्य असलेल्या गटातील तुळशीराम धनराज कोळी यांना नऊ मते मिळाली. एक सदस्य फुटल्याने गेल्या दहा-बारा दिवसापासून सहलीला रवाना झालेल्या नऊ सदस्यांच्या गटाला धक्का बसला आणि सरपंच पद हातून गेले, तर आठ सदस्य असलेला गट ही चार-पाच दिवसापूर्वी सहलीला रवाना झालेला होता. मात्र पडद्यामागून सगळी सूत्रे हलवल्याने एक सदस्य फोडण्यात चंद्रकलाबाई पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे होत्याचे नव्हते तर नव्हत्या चे होते असा प्रकार चहार्डी येथे झाला. सर्वप्रथम सकाळी दहापासून तर बाराच्या दरम्यान सरपंच पदासाठी दोन्ही गटाचे अर्ज दाखल करण्यात आले. आठ सदस्य असलेल्या गटाकडून चंद्रकलाबाई दत्तात्रय पाटील यांनी, तर नऊ सदस्य असलेल्या गटातील गणेश रमेश पाटील यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला. उपसरपंचसाठी आठ सदस्य असलेल्या गटातील ललिताबाई जगन्नाथ बिर्हाडे यांनी तर नऊ सदस्य असलेल्या गटातून तुळशीराम धनराज कोळी यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल झाल्यानंतर दुपारी दोननंतर प्रत्यक्ष सभेला सुरुवात झाली. सभेला सुरुवात होण्यापूर्वीच आठ सदस्य असलेल्या गटातील ग्रामपंचायत सदस्य डॉ.अनिल रामदास पाटील यांनी मतदान गुप्त पद्धतीने घ्यावे, असा लेखी अर्ज देऊन मागणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा चहार्डी मंडळाधिकारी एस.एल. पाटील यांनी मतदान गुप्त होईल असे सांगितले. सरपंच व उपसरपंच पदासाठी समोरासमोर उमेदवार असल्याने मतदान पत्रिका बनवण्यात आली. सरपंच पदासाठी चंद्रकलाबाई दत्तात्रय पाटील यांना कप-बशी आणि गणेश रमेश पाटील यांना कपाट हे चिन्ह तर उपसरपंच पदासाठी ललिताबाई जगन्नाथ बिर्हाडे यांना कपाट तर तुळशीराम धनराज कोळी यांना कपबशी हे चिन्ह देण्यात आले. सर्व १७ सदस्यांना मतदान पत्रिका आणि बाण फुली देऊन गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. मतपत्रिका एका खोक्यात जमा करण्यात आल्या. त्यात सरपंच पदासाठी चंद्रकलाबाई दत्तात्रय पाटील यांना नऊ मते तर उपसरपंच पदासाठी तुळशीराम धनराज कोळी यांनाही नऊ मते मिळाल्याने आठ सदस्य संख्या असलेल्या गटाच्या सरपंच तर नऊ सदस्य असलेल्या गटाचे उपसरपंच निवडले गेले. निवड झाल्यानंतर येथे मध्यवर्ती असलेल्या झाडवन चौकात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नेमके काय होते हे ऐकण्यासाठी गावातील हजारो ग्रामस्थांनी गर्दी केलेली होती. काही काळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र चोपडा शहर पोलिसांनी गावभर वाहन फिरवल्याने तूर्त शांतता झाली होती. मात्र एक सदस्य कोण फुटला याच्या शोधासाठी गावात धुमश्चक्री होण्याची चिन्हे आता निर्माण झाले आहे. सरपंच व उपसरपंच निवडीसाठी पीठासन अधिकारी म्हणून नायब तहसीलदार राजेश पवड, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळाधिकारी एस.एल.पाटील यांनी काम पाहिले तर त्यांना ग्रामविकास अधिकारी आर.एस.पारधी यांनी सहकार्य केले.
चहार्डी येथे अटीतटीच्या निवडणुकीत सरपंचपदाची माळ चंद्रकलाबाई पाटील यांच्या गळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 6:30 PM
एक सदस्य फोडण्यात चंद्रकलाबाई पाटील यशस्वी झाल्या.
ठळक मुद्देउपसरपंचपदी तुळशीराम कोळी एक सदस्य फोडण्यात चंद्रकला पाटील यशस्वी