मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 07:06 PM2020-03-07T19:06:24+5:302020-03-07T20:45:24+5:30
योग्य उपचाराचा अभाव
भुसावळ : जुना सातारा परिसरातील कोळीवाडा येथील वेदांत अनिल मालखेडे या तीन वर्षीय बालकाचा कुत्र्याच्या चाव्यामुळे मृत्यू झाल्याची घटना ७ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातून पूर्ण उपचार न करता त्यास घरी पाठविल्याने या चिमुरड्याचा बळी गेला असून याबाबत नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे.
वेदांत हा २१ फेब्रुवारी रोजी घराच्या अंगणात खेळत असताना मोकाट कुत्र्याने त्याच्या चेहऱ्याला व शरीराच्या इतर भागाला चावा घेतला होता. त्यानंतर त्याला तत्काळ भुसावळ येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथील उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. यानंतर सुमारे ८ दिवस घरीच असताना ७ मार्च रोजी त्याची तब्येत अजून खालावल्याने वेदांतला साकेगाव येथील गोदावरी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले तिथे वैद्यकीय अधिकाºयाने तपासणी केली असता त्याना मृत्यू झाल्याचे सांगितले.
परिसरात हळहळ
अनिल मालखेडे हे एका खाजगी कापड दुकानात कामास असून त्यांची पत्नी मोलमजुरीचे काम करते. हलाकीच्या परिस्थितीमुळे वेदांतवर योग्य उपचार होऊ शकले नाही. तो एकलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आजी- आजोबा, आई-वडिल व एक बारा वर्षाची बहीण असा परिवार आहे. वेदांतच्या मृत्यू झाल्याने मालखेडे कुटुंबाचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.वेदांतच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव
शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही नगर पालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यामुळेच हा बळी गेला असल्याचे बोलले जात आहे.