ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल १०० वर्षांहून अधिक जुना झाल्याने जीर्ण झाला होता. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे, मात्र या पुलाचे काम कोणी करायचे इथपासून तर पुलाचा आकार कसा पाहिजे, इथपर्यंत लोकप्रतिनिधींनी सातत्याने या कामात आडकाठी आणत पोरखेळ चालविला आहे.
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रस्ताव तत्कालीन महानगरपालिकेने तयार केलेला होता. त्यात शहरातील इतरही कामांचा समावेश होता. केंद्र शासनाच्या योजनेतून हे काम करण्याचे प्रस्तावित होते. मात्र त्यावेळी मनपाचा हिस्सा भरण्याचीही क्षमता कर्जबाजारी मनपाची नव्हती. त्यातील बजरंग पूल बोगद्याचा विषय तत्कालीन महापौर नितीन लढ्ढा यांनी मार्गी लावला. मात्र शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलासाठी रेल्वेने त्यांच्या हद्दीबाहेरील पुलाचे काम मनपानेच करावे, असे सांगत हात झटकले होते. मनपाकडे एवढा निधी नसल्याने अखेर मनपाने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्याने त्यांनी हे काम करावे, अशी भूमिका मांडली. अखेर हो-नाही करत तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासनाच्या निर्णयानुसार रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या पुलाचे काम करावे, अशी मंजुरी दिली. त्यामुळे हा विषय मार्गी लागला. त्यानंतर या पुलाच्या आकारावरून वाद सुरू झाला. पुलाचा आराखडा तयार करताना शहराची वाढ लक्षात घेऊन पूर्वी एल आकारात असलेल्या या रेल्वे उड्डाणपुलाची एक शाखा सरळ खाली उतरविण्याचा निर्णय झाला. त्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला. त्यावेळी नगरसेवक मंडळीही या नागरिकांसोबत विरोध करण्यात आघाडीवर होते. तरीही तत्कालीन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पुलाच्या टी आकाराच्या आराखड्यास मंजुरी दिली. त्यानुसार मक्तेदारास टी आकाराच्या पुलाच्या कामाचेच कार्यादेश देण्यात आले. पुलाचे काम सुरू झाले. मात्र विरोध वाढल्याने विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे झालेल्या बैठकीत या विरोधामुळे सध्या एल आकारातील पुलाचे काम करावे. नंतर सरळ खाली उतरणाऱ्या शाखेबाबत निर्णय घेण्याचे ठरले. त्यामुळे एल आकाराचेच काम सध्या सुरू आहे. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही निधीचा तुटवडा आहे. सुमारे ४० लाखांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला करावयाचे असताना मक्तेदाराला जेमतेम ५-७ लाखांची अदायगी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच मनपाने स्वत:च्या निधीतून या रस्त्यावरील विद्युतखांब शिफ्ट करावयाचे असल्याने मनपाच्या नगरसेवकांनी मनपानेच हे काम करावे, असा आग्रह धरल्याने हा विषय रखडला. अजूनही हे काम मार्गी लागलेले नाही. त्यात आता पुन्हा टी आकार की एल आकार असा घोळ घालणे सुरू झाले आहे. त्यामुळे या विकासकामाचा लोकप्रतिनिधींनी जणू पोरखेळ चालविला असल्याचेच दिसून येत आहे.