लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात ४५ वर्षावरील सर्व नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली आहे. यासाठी शुक्रवारी नव्याने लसीचे २७ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. मात्र, लसीकरणाची प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवण्यासाठी अद्याप मोठ्या प्रमाणात डोसची आवश्यकता आहे. पुरेसे डोस उपलब्ध न झाल्यास या चौथ्या टप्प्याच्या लसीकरणाला बंधने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही केंद्रावर लसीकरण बंदही ठेवावे लागत आहे.
४५ वर्षावरील साधारण १४ लाख नागरिक आहेत. शिवाय ज्येष्ठ नागरिकांचा पहिला व दुसरा डोस तसेच ४५ वर्षावरील अन्य व्याधी असलेल्यांचा पहिला व दुसरा डोस हेही सुरू आहेत. यासह अनेक कर्मचाऱ्यांचा अद्याप दुसरा डोस बाकी असून त्यामुळे लसीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ४५ वर्षावरील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करायचे म्हटल्यास १४ लाख डोस लागणार आहेत. केंद्राकडून पुरवठा कमी होत असल्याने आलेल डोस गरजेनुसार जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रांना द्यावे लागत असून यात थेट लसीकरण बंद नाही, मात्र, काही केंद्रांवर ते बंद राहू शकते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले. कोव्हॅक्सिनचे डोस संपले असून कोविशल्डचे डोस प्राप्त झाले आहेत.
१ मे पासून २५ वर्षावरील सर्वांना लस
चौथ्या टप्प्यासाठी महिनाभराचा कालावधी असून यात पहिला डोस आटोपण्याचे उद्दिष्ट असून येत्या १ मे पासून २५ वर्षावरील सर्वांना लसीकरण सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन. एस. चव्हाण यांनी दिली.