लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्याबद्दलची जनजागृती चांगलीच वाढली आहे. त्यामुळे अनेक जण सकाळी उठून फिरायला जातात. काही डॉक्टरदेखील आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना दररोज सकाळी काही अंतर चालण्याचा सल्ला देतात. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत घराबाहेर पडणे देखील धोकादायक बनले आहे, अशा परिस्थितीत मॉर्निंग वॉकला बाहेर पडणारे नागरिक आरोग्यासाठी फिरत आहेत की कोरोनाला निमंत्रण देण्यासाठी, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या दररोज सकाळी मोहाडी रोड, लांडोरखोरी, गणेश कॉलनीतील कन्या शाळा ते आयएमआर, रोझलॅण्ड शाळा, रिंग रोड,महाबळ परिसर, काव्य रत्नावली चौक या भागात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची मोठी गर्दी असते. मेहरुण तलावाच्या काठावर देखील अनेक जण मास्क लावून काही जण विनामास्कचे फिरत असतात. त्यामुळे हे सर्वजण आपल्या आरोग्यासाठी फिरत आहेत की कोरोनाला आपल्यासोबत घरी घेऊन जाण्यासाठी फिरत आहे, हा प्रश्न कायम आहे.
काही दिवस आधी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी क्रॅकडाऊन म्हणजेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर कारवाईदेखील करण्यात आली. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र त्याचा जळगावकरावर फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. शुक्रवारीदेखील अनेक जण मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सकाळी सहा वाजेपासूनच बाहेर पडलेले दिसून येत होते.
भीती वाटत नाही का?
सध्या कोरोना असला तरी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही प्रमाणात का होईना पण व्यायाम करायला हवा, कोरोनाची भीती वाटते. पण त्यासाठी आता सर्व नागरिकांनी तयार राहिले पाहिजे - प्रवीण राजपूत
आम्ही पूर्ण काळजी घेऊनच बाहेर पडतो. किमान काही अंतर चालल्यावर दिवसाची सुरुवात चांगली झाल्यासारखे वाटते. बाहेर पडल्यावर मास्क काढत नाही. तसेच अंतर ठेवूनच फिरतो - संगीता चौधरी
पोलिसांकडून कारवाई
गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात पोलीस मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. मात्र अनेक लहान गल्ली बोळांमध्ये पोलीस बंदोबस्त नसतो. त्यामुळे येथे नागरिक बिनधास्त मॉर्निंग वॉक करत असल्याचे दिसून येते.
खुल्या हवेतही कोरोनाचे विषाणू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणू हवेतही बराच काळ टिकतो. त्यामुळे त्याची संसर्ग पसरवण्याची क्षमता देखील वाढली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे खुल्या हवेत फिरणे देखील धोकादायक ठरले आहे.