चाळीसगाव : शहरातील कैवल्यानगर भागातील सर्वे नं.३१३/१/२/३ मधील हिरापूर रोडलगत असलेल्या ओपन स्पेसवरील अतिक्रमण काढणे व तसेच त्या ठिकाणी चालू असलेले अवैद्य धंदे बंद करण्याबाबत नगरपालिकेवर या परिसरातील रहिवासी शुक्रवारी धडकले. यादरम्यान नागरिकांनी निवेदन देऊन यावर कारवाई झाली नाही तर उपोषणाला बसू, असा इशारासुद्धा दिला आहे.हिरापूररोड कैवल्य नगर परिसरात उघडपणे मोठ्या प्रमाणात दारूविक्री सुरू आहे. हिरापूर रोड लगत असलेल्या सर्वे नं. ३१३/१/२/३ मधील ओपन स्पेस येथे गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत टपºया रात्रीतून उभारल्या जात आहेत. या टपºाामध्ये सर्रासपणे दारू,गांजा, गुटखा, मटका आणि जुगार असे अवैद्य धंदे केले जात आहेत.या ओपन स्पेसला लागून ग्रामीण व तसेच शहरी भागाला जोडणारा ८० फुटी मुख्य रस्ता आहे. यारस्त्यावर सुशिक्षीत लोकांना अन् महिला वर्गाला ये-जा करण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे. टवाळखोर व्यक्ती व दारुडे येथील रहिवासी असलेल्या नागरिकांना त्रास देत आहे. याठिकाणी दिवसा-ढवळ्या दारू विकली जात आहे. येथे रोज दारू पिऊन धिंगाणा घालणे, शिवीगाळ करणे, मारामारी करणे, महिलांचे नावे घेणे अशा अनेक घटना दररोज घडत आहेत. जर हे असेच चालू राहिले तर याठिकाणी मोठा गुन्हा किंवा अनर्थ घडू शकते. हा परिसर सुशिक्षित लोकांचा असून, याठिकाणी होणारे हे अवैद्य धंदे पोलिसांनी त्वरित रोखावे व या ठिकाणी असलेले अतिक्रमण काढून नगरपालिकेने त्वरित तारांचे कंपाऊंड तयार करून द्यावे. जर या ठिकाणचे अतिक्रमण तसेच अवैद्य धंदे यावर येत्या १५ दिवसात काही कारवाही झाली नाही तर आम्ही रहिवासी सजग नागरिक नगपालिकेच्या आवारात सोशल डिस्टन्सिंग पाळून उपोषणाला बसू, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.मुख्याधिकारी शंकर गोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सदाशिव गवळी ,माजी नगरसेवक अनिल जाधव, दत्तू गवळी, पंकज दाभाडे, भूषण दाभाडे, शंभू भोसले, नंदलाल जाधव, धर्मेश बोरसे, कपील दाभाडे, विनित गवळी, नितीन पाटील, योगेश राठोड, रोहित गीते, महेश शिंदे, अमोल शेवाळे, लौकिक जाधव, मंथन झोडगेकर, प्रवीण देवकर व कैवल्य नगरमधील नागरिक उपस्थित होते.
अवैध धंदेप्रकरणी नागरिक धडकले चाळीसगाव पालिकेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 3:51 PM
कैवल्यानगर भागातील सर्वे नं.३१३/१/२/३ मधील हिरापूर रोडलगत असलेल्या ओपन स्पेसवरील अतिक्रमण काढणे व तसेच त्या ठिकाणी चालू असलेले अवैद्य धंदे बंद करण्याबाबत नगरपालिकेवर या परिसरातील रहिवासी शुक्रवारी धडकले.
ठळक मुद्देहिरापूररोड परिसर अवैध टपऱ्या काढा अन् अवैध धंदे तातडीने बंद करा