: येथील
नगर परिषद कर्मचाऱ्यांनी दिनांक १ सप्टेंबर २०१९पासून सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या टप्प्याची रक्कम मिळत नसल्यामुळे बुधवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
यापूर्वीही दिनांक ३ जून रोजी काळ्या फिती लावून त्यांनी काम केले व दि. ८ जूनपासून सर्व न. पा. कर्मचारी भा. म. संघ, शाखा, चोपडा यांच्या नेतृत्त्वाखाली धरणे आंदोलनही केले होते. यासंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली असता आपण राखीव वेतन निधीतून खर्च करणेसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगण्यात आले होते. सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेपैकी पहिल्या टप्प्याची रक्कम आठ दिवसात देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापपर्यंत पहिल्या टप्प्यातील फरकाची रक्कम मिळालेली नाही.
राज्यात व जिल्ह्यात बहुतेक नगर परिषदांमध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून नगर परिषद सफाई कामगार कोरोना काळात अहोरात्र काम करीत आहेत. तसेच नगर परिषदेमधील पाणीपुरवठा, दिवाबत्ती, अग्निशमन विभाग इत्यादी अत्यावश्यक विभाग अहोरात्र काम करीत आहेत. इतर विभागातील कर्मचारी कोरोना काळातही चोख सेवा बजावत आहेत. अनेक कर्मचारी व त्यांचे कुटुंब या काळात कोरोना बाधित झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे. सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेसंदर्भात वारंवार मागणी करूनसुध्दा फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. सालाबादप्रमाणे दरवर्षी मिळणाऱ्या आगाऊ धान्यालाही कर्मचारी वंचित राहिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांंमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याविरोधात हे कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. बुधवारपासून नगर परिषदेतील अत्यावश्यक सेवेसहीत सर्व कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनासाठी पालिकेच्या इमारतीसमोर ठिय्या मारून बसले आहेत. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीची सर्व जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची राहील, असे कर्मचाऱ्यांनी कळविले आहे.