जळगाव : एका मिळकतीवर नाव लावण्यासाठी लाच घेणाऱ्या नगर भूमापन कार्यालयातील लिपिक रघुनाथ सुका फेगडे (वय ४२, रा. भोळेनगर, भुसावळ) यास न्यायालयाने मंगळवारी दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.
जळगाव शहरातील शनिपेठ हद्दीतील गणेश चौधरी यांच्या नावे असलेली बिल्डिंग तक्रारदाराच्या नावे लावण्यासाठी नगर भूमापन कार्यालयातील लिपिक फेगडे याने १७ सप्टेंबर २०१३ रोजी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली होती. या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल होऊन न्यायाधीश आर.एन. हिवसे यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. सरकार पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले. सुनावणीअंती न्यायालयाने फेगडे याला दोषी धरून दोन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. भारती खडसे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी सुनील शिरसाठ यांनी सहकार्य केले.