जळगाव : कोरोनामुळे बंद असलेल्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळांची घंटा तब्बल दहा महिन्यानंतर वाजणार आहे़ बुधवार, २७ जानेवारीपासून हे वर्ग सुरू करण्यास शासनाची परवानगी मिळाली होती. आता स्थानिक प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे़ त्यामुळे आता पुन्हा पाचवी ते आठवीचे वर्ग विद्यार्थ्यांनी गजबजणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते़ त्यामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता दुस-या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांना प्रारंभ करण्याससुध्दा परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे का, शिक्षक किंवा कर्मचारी विलगीकरण कक्षात आहे का, याची खात्री करण्याची सूचना शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिका-यांना देण्यात आली आहे.
सुरक्षित अंतर ठेवावे
पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहे. त्यामुळे वर्गांची स्वच्छता करण्यात आली आहे की नाही, थर्मोमिटर, पल्स ऑक्सिमीटर, सॅनिटायझर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे की नाही, याचीसुध्दा गटशिक्षणाधिका-यांना खात्री करावयाची आहे. तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतर ठेवून बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालकांचे संमतिपत्रसुध्दा भरून घेतले जाणार आहे.