जळगाव : जिल्हा रुग्णालयातील रिक्त असलेले पदे पूर्ण भरले जात नसताना वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेल्या इमारतीत रुग्णांना कमी पडणारी जागा, औषधींचा तुटवडा, मनपा रुग्णालयाची प्रशस्त जागा असतानाही तिचा उपयोग न होणे यामुळे जिल्ह्यातील ‘आरोग्य’चा प्रश्न बिकट बनला आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातच या समस्या कायम असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रश्नाकडे लक्ष देतील का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा रुग्णलायात रिक्त पदे, येथील सुरक्षितता, कर्मचाऱ्यांची वागणूक, रुग्णांकडून पैसे वसुली अशा विविध प्रश्नांमुळे जिल्हा रुग्णालय नेहमीच चर्चेत राहिले. वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे तर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे गंभीर अनुभव आहेत. त्यानंतर जळगावात सुरू होणारे वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयातून सुरू होणार असल्याने जिल्हा रुग्णालय आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले. त्यामुळे येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर आले. पुरेसे डॉक्टर तर आले मात्र ते कक्षात राहत नसल्याच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. आठवडाभरातील तीन वेळा असा अनुभव आला. वैद्यकीय शिक्षण विभागाकडे जिल्हा रुग्णालय हस्तांतरीत झाले त्या वेळी आरोग्य विभागाचे १३ वैद्यकीय अधिकारीदेखील तीन वर्षांसाठी वैद्यकीय शिक्षण विभागासाठीच काम करणार आहे. प्रत्यक्षात ३९ वैद्यकीय अधिकाºयांचे पदे मंजूर असताना १३ वैद्यकीय अधिकारीच कार्यरत होते. आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे रुग्णालय हस्तांतरीत झाल्याने आरोग्य विभागाची उर्वरित पदे भरली जात नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचे डॉक्टर कक्षात हजर नसतात, त्यामुळे रुग्णांना दुहेरी बाजूने त्रास सहन करावा लागत आहे. या शिवाय येथील जागेचा सर्वात मोठा प्रश्न असल्याने जागेअभावी एकेका खाटेवर दोन अथवा तीन रुग्णांना टाकावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांच्या मोठ्या इमारती असल्याने व आता मनपात, राज्यात भाजपाचीच सत्ता असल्याने मनपाच्या रुग्णालयांचा कायापालट होणे अपेक्षित असून तेथे जागा उपलब्ध झाल्यास जिल्हा रुग्णालयातील ताण कमी होण्यास मदत होईल.सध्या खोकल्यासह इतरही औषधांचा तुटवडा असून निधीअभावी अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.
सी.एम. साहेब, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्याच्या ‘आरोग्या’कडे लक्ष द्याल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 1:28 PM