लोकमत न्यूज नेटवर्क
जहगाव : शहरात रविवारी एकही मृत्यू नसल्याने दिलासा होता; मात्र ग्रामीण भागात तीन बाधितांचे मृत्यू व अन्य दिवसांपेक्षा रुग्णसंख्या वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. शहरात १४०, तर ग्रामीणमध्ये ४१ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर तालुक्यात २०१ रुग्णांनी केारोनावर मात केली आहे.
शहरातील नवीन रुग्ण कमी व बरे होणारे अधिक हे दिलासादायक चित्र कायम आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या घटून १६७९ वर आली आहे. रविवारी शहरातील १६० रुग्णांनी केोरोनावर मात केली. रविवारी इतर दिवसांपेक्षा चाचण्यांचे प्रमाण काहीसे कमी होते. जिल्ह्यात रविवारी ४०८४ अँटिजेन, तर आरटीपीसीआरचे २३११ अहवाल प्राप्त झाले. यात अनुक्रमे ६४१ व २६३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, दुसरीकडे प्रलंबित अहवालांची संख्या वाढली आहे. ही संख्या १२८८ वर पोहोचली आहे. जळगाव ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. एकूण रुग्णांची संख्या ४८५१ वर पोहोचली असून, ४३३३ रुग्ण यातून बरे झाले आहेत. मृतांची संख्या १२१ वर पोहोचली आहे.
१३ तालुके शंभराच्या खाली
मध्यंतरी अनेक तालुक्यांमध्ये शंभरापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र, रविवारी जळगाव शहर व जामनेरातच अनुक्रमे १४्र० आणि १०९ कोरोनाबाधित आढळून आले असून, अन्य तालुक्यांमध्ये शंभरापेक्षा कमी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. यात सर्वाधिक भुसावळात ९४, चोपडा ७३, चाळीसगाव ६३ आणि यावल तालुक्यात ६१ रुग्ण आढळून आले आहेत.
१८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
जामनेर तालुक्यातील १८ व ३० वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यासह जिल्ह्यात १६ मृत्यू झाले आहेत. यात जामनेरात ४, जळगाव व भुसावळ तालुक्यात प्रत्येकी ३, रावेर तालुक्यात २ यासह एरंडोल, चाळीसगाव, मुक्ताईनगर, भडगाव या तालुक्यात प्रतयेकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.