व्हॉट्सअॅप आणि फेसबुक येणे म्हणजे डिजिटल साक्षरता नव्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 10:29 PM2019-12-30T22:29:52+5:302019-12-30T22:30:05+5:30
देवयानी ठाकरे : चाळीसगावला महिलांसाठी कार्यशाळा
चाळीसगाव : महिला आता साक्षर झाल्या आहेत. पण आपल्याला त्याहीपुढे डिजिटल साक्षरतेकडे जाणे गरजेचे आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुक येणे म्हणजे डिजिटल साक्षरता नव्हे, तर तंत्रज्ञानाचा वापर करून घरबसल्या बँकांचे आर्थिक व्यवहार, छोटे-मोठे उद्योगसुद्धा आपणास करता आले पाहिजेत. हीच खरी डिजिटल साक्षरता महिलांमध्ये होईल, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले.
महिलांमध्ये डिजिटल साक्षरता विषयक प्रशिक्षण कार्यशाळेप्रसंगी त्या बोलत होत्या. बी. पी. आर्ट्स, एसएमए सायन्स आणि केकेसी कॉमर्स कॉलेजमध्ये राज्य महिला आयोगाच्या सहयोगाने महिलांमध्ये डिजिटल साक्षरता विषयक प्रशिक्षण या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे अध्यक्ष चा.ए. सोसायटीचे क्रीडा समिती चेअरमन क.मा.राजपूत होते. उद्धघाटक म्हणून राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ठाकरे, मार्गदर्शक म्हणून नाशिक येथील जयश्री पाटील, डॉ.राहुल कुलकर्णी, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, उप प्राचार्य अजय काटे, कार्यशाळा प्रमुख डॉ.सुनीता कावळे व कार्यालयीन प्रमुख हिलाल पवार व्यासपीठावर उपस्थतीत होते. डॉ.सुनीता कावळे, क.मा.राजपूत यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वैशाली पाटील व रवी पाटील यांनी केले. आभार प्रा. सुनीता जगताप यांनी मानले.