कोरोना नियंत्रणासाठी समिती गाईडलाईन देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:13 AM2021-05-30T04:13:53+5:302021-05-30T04:13:53+5:30
वासुदेव सरोदे फैजपूर : कोरोना हा संसर्गजन्य आजार जागतिक महामारी म्हणून जाहीर झाला आहे. पॅनडॅमिक ॲण्ड ॲप्रोप्रिएट बिहेवियर ही ...
वासुदेव सरोदे
फैजपूर : कोरोना हा संसर्गजन्य आजार जागतिक महामारी म्हणून जाहीर झाला आहे. पॅनडॅमिक ॲण्ड ॲप्रोप्रिएट बिहेवियर ही संस्था या आजाराचा सामना कसा करायचा, मागील अनुभव, येणाऱ्या समस्या यासाठी गाईडलाईन देशातील राज्यांना देईल. त्या अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती या केंद्रीय समितीचे सदस्य डॉ. अतुल गुणवंतराव सरोदे (सावदा) यांनी ‘लोकमत’ला दिली.
डॉ. सरोदे यांची कोविड-१९ च्या पॅनडॅमिक ॲन ॲप्रोप्रिएट बिहेवियर या राष्ट्रीय स्तरावरील समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न- कोरोनावर परिपूर्ण उपचार आहे का?
कोरोनावर अद्यापही परिपूर्ण असे उपचार नाही. याबाबत स्थापन करण्यात आलेल्या शासकीय समितीवरील आपली नियुक्ती झाल्याने राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळणार असल्याचे निश्चित आहे. कोरोनाला पूर्णपणे नष्ट करायचे असेल तर त्याची साखळी तोडणे गरजेचे आहे. त्यासाठी काही दिवस पूर्ण लॉकडाऊन करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रश्न- ही संस्था नेमके काय कार्य करते?
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही डॉक्टरांची संस्था जी निर्माण होणाऱ्या औषधांना परवानगी देते, तर नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स इंडिया (एनएएसआय) अर्थात नासी ही संस्था ज्यामध्ये रिसर्च होतो व यात शास्त्रज्ञ कार्य करतात. या दोघांनी मिळून कोविड-१९ ही राष्ट्रीय समिती निर्माण केली आहे. त्यात संपूर्ण भारतातून १० सदस्य आहे व त्याचे प्रतिनिधित्व डॉ. मंजू शर्मा या करणार आहे. त्या १० सदस्यांमध्ये आपला समावेश आहे.
प्रश्न- तिसऱ्या लाटेच्या चर्चेविषयी काय सांगाल?
कोविड-१९ हा आजार जागतिक महामारी म्हणून घोषित झाला आहे. सध्या देशपातळीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा आहे. त्याचा लहान मुलांना धोका होणार अशी चर्चा सुरू आहे, तर त्यासाठीच्या उपाययोजना वैद्यकीय क्षेत्र, सामान्य नागरिक यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणे, ती योग्य का अयोग्य त्याचा फीडबॅक घेऊन निर्णय घेण्याचे कार्य समिती करणार आहे.
प्रश्न- कोरोना नियंत्रणासाठी काय प्रयत्न?
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या काळात सर्वात महत्त्वाचे जनतेचे प्रबोधन करणे त्यांना समजेल उमजेल, त्या भाषेत माहितीचे साहित्य उपलब्ध करून त्याचा प्रचार करणे, यासाठी ग्रामीण भागात प्रयत्न करावे लागतील व ते करण्यासाठी आग्रही राहणार आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीसाठीची ही मार्गदर्शक तत्त्वे ही समिती जाहीर करून त्यासाठी योग्य ते माहितीचे साहित्य देण्याचा मनोदयही राहणार आहे.
प्रश्न- या समितीत निवड कशी झाली
नासी या संस्थेमध्ये दोन वर्षांपासून संलग्न आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पर्यावरणशास्त्र विषय हा विशेष निमंत्रित प्राध्यापक म्हणून मी शिकवीत असतो. तसेच जागतिक सेमिनारमध्येसुद्धा भाग घेतलेला आहे. एका चर्चासत्रामध्ये भाग घेतलेला असताना त्यात मांडलेल्या सिद्धांताची दखल घेतली गेली. त्यामुळेच या संस्थेवर कार्य करण्याची संधी मिळाली आहे.