जळगाव : कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन करीत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला. तसेच फैजपूरच्या ऐतिहासिक भूमीतून केंद्र सरकारच्या तीन काळ्या कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलनाचे रणशिंग फुंकले.
बुधवारी फैजपूर आणि भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेल्या किसान मेळाव्यात ते बोलत होते. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला.
ब्रिटिश राजवटीला उलटून लावण्याचे कार्य ज्या ऐतिहासिक भूमीतून झाले, त्या फैजपूर ग्रामीण काँग्रेसच्या अधिवेशनस्थळी बुधवारी देशविरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांचे दहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. केंद्र सरकारला सत्तेतून दूर करण्याची आग या भूमीतून घेऊन जाणार असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.
फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा प्रभारी आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रीय समन्वयक श्याम पांडे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार रमेश चौधरी आदी उपस्थित होते.
आपणही ‘अच्छे दिन’च्या स्वप्नात भारावून गेलो होतो. मात्र नोटाबंदी व जीएसटीनंतर भाजपचा खरा चेहरा उघड झाला. कोरोना ही अघोषित आणीबाणी असल्याची टीका पटोले यांनी केली.