सायंकाळी झालेल्या या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी ब्रेकडाऊन होऊन वीजपुरवठा खंडित झाला, तर लक्ष्मीनगरात विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. याबाबत नागरिकांनी महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर, तत्काळ तेथील सहायक अभियंता विवेक चौधरी हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. मात्र, तुटलेल्या तारा जोडण्यासाठी रस्त्यावरील एका लिंबाच्या झाडांच्या फाद्यांचा अडथळा येत असल्याचे चौधरी यांच्या लक्षात आले, तसेच या फाद्यांवर मधमाश्यांचे एक मोठे पोळ बसल्याचे दिसून आले. जर हे पोळ काढले असते, तर मधमाशांनी वीज तारा जोडणीचे काम करू दिले नसते. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या मधमाश्यांच्या पोळ्याला कुठलाही धक्का लागू न देता, अत्यंत सावधगिरीने काम करून वीजपुरवठा सुरळीत केला.
इन्फो :
...अन् नागरिकांनी मानले महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आभार
महावितरणचे सहायक अभियंता विवेक चौधरी व त्यांचे सहकारी राजेंद्र कुमावत, विशाल तिवणे, दिवाकर असणे, सचिन जाधव, कपील पाटील या कर्मचाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने हे काम करून, वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी या कर्मचाऱ्यांचे कौतुक करून, त्यांचे आभार मानले. दरम्यान, जर या ठिकाणच्या वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला नसता, तर बुधवारी पहाटे या भागात येणारे पिण्याचे पाणी नागरिकांना भरता आले नसते. त्यामुळे नागरिकांना वीजपुरवठा सुरू झाल्यामुळे दिलासा मिळाला.