जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता विविध शुल्कात सवलत देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिमखाना शुल्क, आपत्कालीन व्यवस्थापन शुल्क, विद्यार्थी उपक्रम शुल्क, गरीब विद्यार्थी सहाय्यता निधी, अश्वमेध शुल्क, स्नेह संमेलन शुल्क व व्यक्तिमत्त्व विकास व व्यवसाय रोजगार मार्गदर्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा व ग्रंथालय शुल्क आणि प्रयोगशाळा शुल्क (विज्ञान) शुल्क पन्नास टक्के माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
शुल्क तीन हप्त्यात भरण्याची सवलत
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांचे आई/वडील/पालक कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मयत झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा सुध्दा निर्णय घेण्यात आला आहे. ही सवलत ही शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता लागू असेल. शुल्क माफी व्यतिरिक्त इतर शुल्क विद्यापीठाच्या प्रचलित नियमानुसार आकारण्यात येईल. विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क तीन हप्त्यात भरण्याची सवलत सुध्दा देण्यात आली असून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्याकडे थकीत शुल्क असल्यास परीक्षेचा अर्ज अडवण्यात येऊ नये, असेही निर्देश महाविद्यालयांना विद्यापीठाने पत्राद्वारे कळविले आहे.