ग्राहकांनी वस्तुंची खरेदी करताना सजग राहणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 08:53 PM2020-12-24T20:53:24+5:302020-12-24T20:53:33+5:30
राष्ट्रीय ग्राहक दिन : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन
\
जळगाव- ऑनलाईन खरेदीच्या जमान्यात ग्राहकांनी वस्तुची किंमत, दर्जा, उपयोगिता आदींबाबत सजग राहूनच वस्तुची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखेमार्फत गुरूारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. संजय बोरवाल, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, पोलीस उप अधीक्षक अरुण धनावडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त य. को. बेंडकुळे, वैधमापन शास्त्र विभागाचे सहायक आयुक्त बी. जी. जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेबिनारमध्ये जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी ऑनलाइन सहभागी झाले होते.
परिपूर्ण माहिती असेल तरच खरेदी करा...
ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांनी ऑनलाईन वस्तुंची विक्री करणाऱ्या संस्थांबाबत अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. आपणास आवश्यक असलेल्या वस्तुबाबत परिपूर्ण माहिती करुन घेतल्याशिवाय वस्तुची खरेदी करु नये. विशेषत: आर्थिक व्यवहार करतांना ग्राहकांनी खुप काळजी घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन खरेदीत आपल्या एटीएमचा पीन गोपनीय राहील, ओटीपी कोणालाही देवू नये, रक्कमेची नोंद करतांना काळजी घ्यावी, अनावश्यक ॲप डाऊनलोड करु नये, लॉटरी लागल्याचा इमेल प्राप्त झाला असल्यास त्याबाबत खात्री करावी. जेणेकरुन स्वत:ची व इतरांचीही फसवणूक आपण टाळू शकतो असेही जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
बील घेणे आवश्यकबील घेणे आवश्यक
ग्राहकांच्या संरक्षणासाठी १९८६ मध्ये केलेल्या कायद्यात २०१९ मध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. नवीन कायदा हा ग्राहकांना वरदान ठरणार असून ग्राहकांचे सहा हक्क आहेत त्याची माहिती ग्राहकांनी करुन घेणे आवश्यक आहे. ग्राहकाने वस्तुची खरेदी करतांना जागरुक राहून त्याचे बील घेणे आवश्यक आहे, असे न्या. बोरवाल यांनी वेबिनारमध्ये सांगितले. तसेच बेंडकुळे यांनी अन्न पदार्थांविषयीच्या तर डॉ माणिकराव यांनी औषधांविषयीच्या कायद्यांची माहिती दिली तसेच अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे वेळोवेळी करण्यात आलेल्या तपासणी मोहीमची व दोषींविरुध्द केलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती दिली.