दुषित पाणी पुरवठ्यामुळे उभा राहिला आरोग्याचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 10:50 PM2020-10-27T22:50:39+5:302020-10-27T22:50:48+5:30
जोंधनखेड्याची समस्या : दुर्लक्ष होत असल्याने नाराजी
मुक्ताईंनगर : तालुक्यातील जोंधनखेडा येथे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा केला जात असून या संदर्भात वारंवार तक्रार करून देखील ग्रामपंचायत स्तरावर कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यातील जोंधनखेडा हे जवळपास चार ते पाच हजार लोकवस्ती असलेले कुऱ्हा परिसरातील अतिशय महत्त्वपूर्ण व मुक्ताईनगर तालुक्यातील शेवटचे गाव आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी एक विहीर असून या विहिरी वरूनच पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. संपूर्ण गावात पाईपलाईन करण्यात आलेली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून जोंधनखेडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या या एकमेव विहिरीचे पाणी अशुद्ध झाले असून घाण या पाण्यात साचलेली आहे , तसेच पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे.
विशेष म्हणजे गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन देखील ठिकाणी फुटलेली असून पाणी गळती तर होतच आहे. परंतु त्यासोबतच पाण्यामध्ये पाईपलाईन द्वारेही घाण शिरत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना मुतखड्याचे आजार झाले आहेत.
या संदर्भात ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारे उपाययोजना होत नाही, अशी ओरड आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडेही तक्रार केलेली आहे. त्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.