ठेकेदाराकडून चोपडा नपाच्या अपंग कर्मचाऱ्यास धमकी, कर्मचाऱ्यांनी केले काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:46 PM2019-07-05T12:46:30+5:302019-07-05T12:46:43+5:30
आंदोलन
चोपडा, जि. जळगाव : येथील नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अपंग कर्मचारी यु.बी. खेवलकर यांना ४ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता कार्यालयात येऊन विनाकारण ठेकेदार सुनील उखाराम दहीवेलकर यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिल्याचा प्रकार घडला. यामुळे ५ रोजी सकाळी १०.०० वाजता सर्व कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या वेळी प्रशासकीय इमारतीसमोर सदर ठेकेदारविरोधात घोषणाबाजी केली.
सर्व कर्मचाºयांनी जळगाव जिल्हा नगरपालिका मजदूर संघ शाखा चोपडा मार्फत आंदोलन केले. तसेच संघातर्फे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात ठेकेदार सुनील दहीवेलकर यांनी सरकारी कामात अडथळा आणून दमबाजी केली म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन करणार असल्याचे नमूद केले आहे.निवेदनावर मजदूर संघाचे अध्यक्ष दीपक घोगरे, सरचिटणीस यु.बी. खेवलकर यांच्या स्वाक्षरी आहेत. कामबंद आंदोलनात पालिकेतील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, नगराध्यक्षा, तहसीलदार, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, मजदूर संघाचे जिल्हाध्यक्षांंना पाठविण्यात आले आहे.