जळगाव : व्हाॅट्सअपवर चिथावणी देणारे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून चौघुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात वाद उफाळून गोळीबाराची घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही गटाविरुद्ध शनी पेठ पोलीस ठाण्यात दंगल व आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नीलेश रमेश हंसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय जयवंत शिंदे, राहुल अशोक शिंदे, किशोर जयवंत शिंदे राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंके (सर्व रा. चौघुले प्लाॅट) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.
फिर्यादीत म्हटल्यानुसार, विजय शिंदे याने मोबाईलमध्ये चिथावणीखोर तथा धमकी देणारे स्टेटस ठेवले होते. त्यावर नीलेश हंसकर व इतरांनी त्याला जाब विचारला असता तिघांनी हंसकर गटाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर लिंबू राक्याने दहशत व ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल काढून विक्रम राजू सारवान याच्यावर गोळीबार केला. त्यात त्याच्या डाव्या गालाच्यावर गोळी लागून जखम झाली आहे तर किशोर शिंदे याने तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादीत नमूद आहे.
एसपींसह अधिकारी तळ ठोकून
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह प्रभारी अधिकारी व पोलिसांचा ताफा चौघुले प्लॉट भागात तळ ठोकून होता. डॉ.मुंढे यांनी पोलिस ठाण्यात संशयितांची चौकशी केली. शिंदे गट फरार झाला असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. सारवान गटाच्या चार जणांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले होते. याभागात तणावपूर्ण शांतता असून बंदोबस्त कायम आहे.
याआधीही सट्टयावरून दंगल
शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यातील ही दुसरी दंगल आहे. याआधी देखील सट्टयावरून दोन गट एकमेकांशी भिडले होते. त्यात एकाची प्रकृती चिंताजनक झाली होती. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहमीच गॅंगवार व अवैध धंदे याकारणावरुन दंगलीसारख्या घटना घडलेल्या आहेत. आताही लाॅकडाऊन, कडक निर्बंध असताना ही घटना घडली.