- सुनील पाटील जळगाव : लाचखोरीत पोलीस व महसूल हे विभाग अग्रेसर असल्याचे सिध्द होत असताना दोष सिध्द होण्यातही हे दोनच विभाग अग्रेसर आहेत. राज्यात ५४ गुन्ह्यांत ६५ आरोपींना शिक्षा झाली असून सर्वाधिक १५ प्रकरणात १७ पोलिसांना शिक्षा झाली. १२ प्रकरणात महसूल विभागाच्या १५ जणांना शिक्षा झाली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या २०१९ ते आॅगस्ट २०२० पर्यंतच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये सर्वाधिक ४ अधिकारी हे वर्ग १ चे आहेत. मंत्रालयातील नगरविकास विभागाचा उपसचिव आनंदराव जिवणे, खामगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता विजय पाटील, सोलापूर ग्रामीणमधील पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे व सोलापूर पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता वसंत ढोके याचा समावेश आहे.
शिक्षा झालेल्यांमध्ये सर्वाधिक ६ आरोपी जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यात चाळीसगाव वन परिक्षेत्रीय कार्यालयातील वनसंरक्षक विठ्ठल भास्कर पाटील, वनपाल रघुनाथ रामदास देवरे, जि. प.च्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक विनायक वनाजी बैसाणे, चाळीसगाव पंचायत समितीचा वरिष्ठ सहायक शांताराम गोविंद निकम, मेहुणबारे पोलीस ठाण्याचा कर्मचारी विजय श्रीराम पाटील व कजगाव, ता. भडगाव येथील तलाठी धनराज भावराव मोरे यांचा समावेश आहे.
१३ लाखांचा दंड
न्यायालयाने दंडही ठोठावला आहे. त्यात सर्वाधिक ५ लाख १ हजार रुपये दंड नगरविकास विभागाला, ३ लाख १५ हजार ५०० रुपये दंड महसूल विभागाच्या प्रकरणात, १ लाख ३० हजार रुपये दंड पोलीस विभागाला सुनावला आहे. ५४ गुन्ह्यात ६५ आरोपींना १३ लाख ४० हजार ५०० रुपये दंड ठोठावला आहे.