अपेक्षेपेक्षा १५ दिवस अगोदरच कोरोनावर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:15 AM2021-05-30T04:15:22+5:302021-05-30T04:15:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रुग्णसंख्या ज्या वेगाने वाढली त्या वेगाने उपाययोजना करण्यावर भर देण्यासह मे महिन्याच्या मध्यापासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना रुग्णसंख्या ज्या वेगाने वाढली त्या वेगाने उपाययोजना करण्यावर भर देण्यासह मे महिन्याच्या मध्यापासून लागू केलेले कडक निर्बंध यामुळे कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविता आले. यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना पाहता जून महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना नियंत्रणात येण्याची अपेक्षा होती. मात्र त्याच्या १५ दिवस अगोदरच आपल्याला कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ''लोकमत''शी बोलताना दिली.
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला. यामध्ये गंभीर रुग्ण देखील अधिक असल्याने जिल्हाभरात चिंतेचे वातावरण होते. यावर आता बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात आले असून दररोजची रुग्ण संख्या २०० च्या आत आली आहे. या नियंत्रणाविषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माहिती दिली. यावेळी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात त्यांच्याशी झालेला हा संवाद...
प्रश्न - १२०० च्या पुढे गेलेली रुग्णसंख्या कशी नियंत्रणात आली?
उत्तर : फेब्रुवारी महिन्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला व हळूहळूही संख्या वाढत जाऊन १२००च्या पुढे गेली. मात्र रुग्ण संख्या वाढली तरी घाबरून न जाता त्यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनासह सर्वच पातळीवर उपाययोजना करण्यास वेग आला. यामध्ये चाचण्यादेखील वाढविण्यात आल्याने रुग्ण समोर येत गेले व संसर्ग रोखण्यात यश येऊ लागले.
प्रश्न : जिल्ह्यातील स्थिती पाहता वेग कधीपासून कमी झाला?
उत्तर : तसे पाहता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या कमी झाली. त्यातल्या त्यात ५ मे पासून रुग्णसंख्या आणखी कमी झाली.
प्रश्न : ५००च्या आत रुग्णसंख्या येण्यास कोणता उपाय महत्त्वपूर्ण ठरला?
उत्तर : गर्दीवर नियंत्रण मिळवावे यासाठी वेगवेगळ्या विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली. यात त्यांनी चांगली कामगिरी केली तसेच ही संख्या आणखी कमी व्हावी यासाठी १५ मेपासून कडक निर्बंध लागू करीत सकाळी ११ वाजेनंतर बाहेर फिरणाऱ्यांची कसून चौकशी केली जाऊ लागली. त्यामुळेदेखील नागरिक बाहेर पडणे कमी झाले व संपर्क कमी होऊन रुग्ण संख्या नियंत्रणात आली.
प्रश्न : नियंत्रणासाठी कालमर्यादा ठरवली होती का?
उत्तर : तसे पाहता कोरोना जेवढा लवकरात लवकर नियंत्रणात येईल यावर यंत्रणेचा भर असतो. मात्र जिल्ह्यातील वाढलेली रुग्णसंख्या व करण्यात आलेल्या उपाययोजना यानुसार १५ जूनपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल अशी अपेक्षा होती. मात्र सर्वांच्या सहकार्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या २०० च्या आत येण्यास यश आले आहे.
प्रश्न : शहरी भागासह ग्रामीण भागात काही विशेष उपाययोजना केल्या गेल्या का?
उत्तर : हो नक्कीच. दोन्ही ठिकाणी उपाययोजनांवर भर देण्यात आला. शहरी भागामध्ये वेगवेगळ्या वस्तीमध्ये जाऊन तपासणी करण्यासह विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची अँटिजन चाचणी करण्यात आली. तसेच ग्रामीण भागात देखील उपकेंद्रांवर तपासणीवर भर देण्यात आला. यामुळे झपाट्याने रुग्ण समोर येऊ लागले व त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने ग्रामीण भागात देखील संसर्ग रोखण्यात यश मिळाले.
--------------------
सर्वच यंत्रणांचा महत्त्वपूर्ण सहभाग
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या गेल्या. यामध्ये त्रिसूत्रीचा अंमल महत्त्वाचा भाग असून जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था तसेच व्यापारी, नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला दिलेली साथ यामुळे जिल्ह्यात दिलासादायक चित्र निर्माण होत आहे, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातच ग्रामीण भागात तपासणीवर भर
इतर जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी ग्रामीण भागात सहजासहजी सुविधा उपलब्ध नसतात. मात्र जळगाव जिल्ह्यात आपण आरोग्य उपकेंद्रांपर्यंत चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून दिल्याने चाचण्या वाढल्या व संभाव्य धोका रोखता आला, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
---------------------
सर्व यंत्रणांचा सहभाग यासह सामाजिक संस्था, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग यांच्या सहकार्याने आपण कोरोनावर नियंत्रण मिळवित आहोत. आता रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोरोना गेला असे समजू नये. यासाठी शासन, प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत स्वत:सह आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी