कोरोना, कर्जमाफी, पिक कर्ज, किसान सन्मान योजनेचा विभागीय आयुक्त घेणार आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 11:51 AM2020-09-07T11:51:28+5:302020-09-07T11:52:04+5:30
बुधवारी जळगावात बैठक
जळगाव : गेल्या आठवड्यात पदभार स्वीकारल्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे बुधवारी जळगाव जिल्ह्यात येत असून या दौऱ्यामध्ये ते कोरोना उपाययोजना, कर्जमाफी, पिक कर्ज वितरण, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या सर्वांच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार, ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी बैठकही होणार आहे.
गेल्या आठवड्यात राधाकृष्ण गमे यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्या वेळी त्यांनी पहिल्याच बैठकीत नाशिक विभागाचे काम नियोजन पद्धतीने करण्यावर भर राहणार असल्याचे सांगितले होते. तसेच शासकीय कामांना गती देण्यासाठी जिल्हानिहाय आढावा घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ते बुधवार, ९ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात येणार आहेत. यामध्ये कोरोना उपाययोजना व जिल्ह्यात असलेली स्थिती, शेतकरी कर्जमाफी स्थिती, शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आलेल्या पिक कर्ज वितरण स्थिती, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या सर्वांच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत.
या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार, ७ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पूर्व तयारी बैठक घेण्यात येणार आहे.