रिॲलिटी चेक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना संसर्ग प्रचंड वाढत असल्याने शाळांवरही त्याचा परिणाम झाला असून उपस्थिती निम्म्याने घटली आहे. महाविद्यालयांमध्ये उपस्थिती अधिक आहे, मात्र, या ठिकाणी कुठलेही नियम पाळले जात नसल्याचे गंभीर चित्र आहे. काही शाळा, महाविद्यालयांना सोमवारी भेटी देऊन पाहणी केली असता हे चित्र समोर आले.
रुग्णसंख्या वाढली तर शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो, असे संकेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका कार्यक्रमात दिले होते. दरम्यान, शाळा-महाविद्यालयांमध्ये अद्यापही कोरोनाची दक्षता तेवढ्या गांभिर्याने घेतली जात नसल्याचे चित्र आहे. विद्यानिकेतन शाळेत विद्यार्थ्यांचे सॅनिटाईज केल्याशिवाय आत सोडले जात नाही, शिवाय पाणी बॉटल घरूनच आणण्याच्या सूचना असल्याचे शिक्षकांनी सांगितले. दरम्यान, अनेक ठिकाणी थर्मल गन किंवा ऑक्सिमीटर अशी कुठलीच तपासणी होत नसल्याचे चित्र आहे.
पालकांमध्ये भीती
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी एकत्र येणारच नाही, याची कुठलीच शाश्वती नसल्याने याठिकाणाहून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहेच, त्यामुळे पालकामंध्येही आता भीतीचे वातावरण असून त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठवित नाहीत व त्यामुळे विद्यार्थी संख्या घटल्याचे शिक्षकांनी सांगितले.
हे होते चित्र
- विद्यानिकेतन शाळेत भेट दिल्यानंतर या ठिकाणी दहावीच्या वर्गात अगदी बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षक शिकवत होते.
- या ठिकाणी सहावी ते दहावीचे वर्ग आहेत मात्र, केवळ दहावीचा वर्ग सुरू होता. विद्यार्थी नसल्याने अन्य वर्ग बंद असल्याचे सांगण्यात आले.
- नूतन मराठा महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये अनेक विद्यार्थी घोळका करून उभे होते, मात्र, एकाने मास्क परिधान केला नव्हता. महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये एकत्रित विद्यार्थी बसलेले होते, मात्र त्यांनीही मास्क परिधान केलेले नव्हते.
- अनेक विद्यार्थ्यांनी मास्कऐवजी रूमाल बांधलेला होता व तो रुमालही गळ्यावर उतरवलेला होता.
-इकरा विद्यालयाच्या बाहेर काही विद्यार्थी लिफ्ट मागत होते, मात्र, यातील छोट्या विद्यार्थ्यांनीही मास्क परिधान केलेला नव्हता
- शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थी शिस्तीत बसून होते, मास्क परिधान केलेला होता, ‘नो मास्क नो एंट्री’ असा फलक या ठिकाणी लावून ठेवण्यात आला आहे.