ममुराबाद, ता. जळगाव : गावात गेल्या पाच महिन्यांपासून एकही कोरोना बाधित रूग्ण आढळला नव्हता. मात्र, सोमवारी ५० वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सगळीकडे चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान, धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
ममुराबाद येथे गेल्या वर्षी १९ जून २०२० रोजी वॉर्ड ३ मधील खंडेरावनगरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर विविध वॉर्डात सातत्याने रुग्ण वाढत गेले आणि कोरोना बाधितांची संख्या सुमारे ९५ पर्यंत जाऊन पोहोचली. दरम्यानच्या काळात अन्य आजाराने आधीच ग्रस्त असलेल्या सहा रुग्णांचा विविध ठिकाणच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवाने मृत्यू झाला. मात्र, आरोग्य यंत्रणा, आशा स्वंयसेविका व अंगणवाडी कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नाने वेळीच शोध व उपचार मोहीम राबविण्यात आल्याने वेळेवर उपचार मिळाल्यामुळे अनेक रुग्णांनी कोरोनावर नंतर मातसुद्धा केली होती. स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिल्याने २८ सप्टेंबरपासून गावात एकही कोरोना बाधित रुग्ण आढलेला नव्हता. जनजीवन पूर्वपदावर आल्याने ग्रामस्थांनीही सुटकेचा निःश्वास सोडला होता. परंतु, सोमवारी पुन्हा एक नवीन रुग्ण आढळल्यानंतर अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले. संबंधित रुग्णावर जळगाव शहरातील शासकीय पाॅलिटेक्निकमध्ये सद्या उपचार सुरू असून संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळाली.
----------
(कोट)...
ममुराबाद गावात सद्या एक कोरोना बाधित रुग्ण आहे. परिस्थितीत नियंत्रणात असली तरी आरोग्य विभागाला घरोघरी जाऊन नियमित सर्वेक्षण करण्याबाबत कळविले आहे. याशिवाय ग्रामस्थांना घराबाहेर पडल्यावर तोंडाला मास्क लावण्यासोबत सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.
- हेमंत चौधरी, सरपंच, ममुराबाद