कोरोना रुग्णाच्या अस्थी स्मशानातच पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 11:17 PM2021-06-02T23:17:27+5:302021-06-02T23:17:53+5:30
कोरोनाने निधन झालेल्या व्यक्तींपैकी अनेकांच्या अस्थी घेण्यासाठी त्यांचे आप्तस्वकीय येतच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : येथे कोरोनाने निधन झालेल्या व्यक्तींपैकी अनेकांच्या अस्थी घेण्यासाठी त्यांचे आप्तस्वकीय येतच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी शहरातील स्मशानभूमीत अनेकांच्या अस्थी विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहेत. मृतदेह जळाल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या राखेचे ढिगारेही स्मशानभूमीतच साठत आहेत.
स्मशानभूमीत सेवा देणारे या राखेला अंबॠषी टेकडीच्या पलीकडे खड्ड्यात पुरतात. नागरिकांना संसर्ग होऊ नये म्हणून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर पालिका कर्मचारी अंत्यसस्कार करीत आहेत. पीपीई किट घालणाऱ्या नातेवाइकांनाच अग्नी देण्याची परवानगी दिली जाते. काहींचे नातेवाईक अस्थी घेण्यासाठी येतात. मात्र, राखेला संसर्गाच्या भीतीने स्मशानभूमीतच पडू देतात. त्यामुळे स्मशानभूमीत सध्या अस्थींचा ढीग साचलेला दिसून येतो.