कोरोना महामारीने लग्नसराई ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 03:26 PM2020-04-12T15:26:53+5:302020-04-12T15:28:29+5:30

अनेक नियोजित वधू-वरांचे शुभमंगल कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने तालुक्यात शेकडो विवाह समारंभ ठप्प झाले आहेत.

Corona pandemic stalled | कोरोना महामारीने लग्नसराई ठप्प

कोरोना महामारीने लग्नसराई ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देजामनेर तालुक्यात निश्चित झाले होते दीडशेवर लग्न लॉकडाऊनमुळे सर्वांवर फिरले पाणी

सय्यद लियाकत
जामनेर, जि.जळगाव : एप्रिल-मे महिना म्हटला की लग्नसराईची धूम, पण यावर्षी लग्नसराई कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने सोयरीक झालेले अनेक नियोजित वधू-वरांचे शुभमंगल कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने तालुक्यात शेकडो विवाह समारंभ ठप्प झाले आहेत. आज १२ एप्रिल रोजी तालुक्यात जवळपास दीडशे विवाहाचे नियोजन होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते रद्द करण्यात आले आहेत.
तालुक्यासह शहरात यावर्षी बहुतांश मुले, मुलींच्या सोयरीक झाल्या होत्या. अनेक मुलीचे कुंकू, साखरपुडा तर मुलांचे टीळे पार पडले होते. अनेकांनी लग्नाच्या तारखादेखील निश्चित केल्या होत्या. मंगल कार्यालये बुक केले होते. लग्नपत्रिका छापल्या, तर कित्येकांनी नातेवाईकांना, मित्रमंडळींना मूळपत्रिकादेखील वाटल्या होत्या. कित्येकांनी मंडप, वाजंत्री, स्वयंपाकी लावले होते. कित्येकांनी कपड्याचा बस्ता बांधून वाहने बुक केली होती. लग्नाची तयारी केली खरी, पण जगात भेडसावणाऱ्या लॉकडाउनमुळे जनतेला घरात बसण्याची वेळ आली आहे. गुढीपाडवा ते चैत्र पोर्णिमेपर्यंतचे १५ दिवस सहसा लग्नतिथी काढत नाहीत. पंचागाप्रमाणे १२ एप्रिलपासून विवाह समारंभास पुन्हा सुरुवात होणार होती. पण सर्वच विवाह कोरोनाच्या विळख्यात सापडले असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या वधू-वरांची चांगलीच पंचायत झाली आहे.
लग्न समारंभांची तयारी करून बसलेले वधूवर पिता मजूर, शेतकरी कुटुंबातील असून, खर्च करून चांगलेच अडचणीत आले आहेत. लग्नाच्या तयारीसाठी त्यांनी अगोदरपासूनच शेतातील पिकांचे नियोजन लावले होते. मका, कापूस, तूर आधी विकून एक एक पैसा जमा करून लग्नाची तयारी केली होती. मात्र लॉकडाउनमुळे पूर्णपणे निराशा झाली.
तालुक्यात पुढील दोन महिन्यात जवळपास ५०० नियोजित विवाह समारंभ होणार होते. परंतु कोरोना महामारीने जनता भयभीत झाल्याने लग्न समारंभ सध्या तरी ठप्प झाले आहेत.

Web Title: Corona pandemic stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.