कोरोनाने शिकविले कॉस्टकटिंग; किचनपासून कटिंगपर्यंत खर्चकपात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:12 AM2021-07-11T04:12:55+5:302021-07-11T04:12:55+5:30
बाहेर जाणे झाले कमी : हॉटेलिंगवरील खर्चासह इंधनाचीही बचत जळगाव : अख्या जगाला वेठीस धरलेल्या कोरोनामुळे आरोग्यविषयक उपाययोजनांचा धडा ...
बाहेर जाणे झाले कमी : हॉटेलिंगवरील खर्चासह इंधनाचीही बचत
जळगाव : अख्या जगाला वेठीस धरलेल्या कोरोनामुळे आरोग्यविषयक उपाययोजनांचा धडा जसा शिकविला, तसा बचतीचाही धडा याच कोरोनाने दिला आहे. पगार कपात असो की, आरोग्यविषयक खर्चात झालेली वाढ असो, अशा वेगवेगळ्या कारणांनी प्रत्येकाला बचतीची सवय लावली आहे. यात किचनपासून कटिंगपर्यंतच्या खर्चात कपात केली जात असल्याचे आढळून आले.
खरे म्हणजे फक्त कोरोना काळातच नव्हे तर आयुष्याच्या सर्वच टप्प्यांवर बचतीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. पैशांची चणचण असली तरी आपोआपच माणूस आधी गरज कशाची याचा विचार करूनच खर्च करतो. पण सुबत्ता आली की हात थोडा सैल होतो. आता जे लोक वयाच्या साधारण पन्नाशीपुढे आहेत त्यांनी आधीची पिढी पहिली आहे, ती कोणताही खर्च करताना, अगदी सुबत्ता असली तरी, अतिशय विचारपूर्वकच खर्च करीत होती. आता हा धडा कोरोनामुळे सर्वच जण घेत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.
१) कोरोनाने भल्या भल्या लोकांचा उद्योगधंदा, नोकरी यावर गदा आणली. त्यावर पुढचा मार्ग निघेपर्यंत बचतीवर गुजराण करण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता.
२) हे चित्र अनेकांनी पाहिले आणि यातून काहीतरी धडा घ्यावा म्हणून अनेक जण बचतीला महत्त्व दिले जाऊ लागले.
३) आज अनेक घरात हॉटेलिंग कमी होण्यासह कपडे, इंधन यावर होणारा खर्च कमी केला. तसेच किचनमध्ये आवश्यक तेवढ्याच गोष्टींचा योग्य वापर करणे व अन्न वाया जाणार नाही, याची दक्षता घेऊ लागले.
कुठे-कुठे केली कॉस्टकटिंग
- कोण कसे राहतो, काय करतो, या दिखाऊ गोष्टींपासून लांब राहिलेले बरे
- मुलांच्या कपड्यांचा वापर कमी होण्यासह लग्नसमारंभही कमीच, त्यामुळे कपड्यांवरील खर्चात कपात
- मोबाइलवर दररोज आवश्यक तेवढ्याच डाटाचे पॅकेज
- विनाकारण बाहेर फिरणे टाळून वाहनांवर होणारा खर्च कमी केला.
- लॉकडाऊनमुळे व निर्बंधांमुळे दुकाने बंद असल्याने मुलांच्या खेळण्यांची खरेदी कमी होऊन तो खर्च आपोआप कमी
- शाळा, महाविद्यालय बंद असल्याने केसांच्या कटिंगबाबत फारशी विचारणा नाही, त्यामुळे कटिंगही दोन ते तीन महिन्यातून
------
कष्टांना पर्याय कुठेच नाही. तेव्हा कमावलेले पैसे विचारपूर्वक खर्च करा. बचत होऊन या गुंतवणुकीतून आलेले उत्पन्न स्वत:साठी खर्च करता येऊ शकते. हा विचार करून खर्चात कपात करण्यावर भर देत आहोत.
- माया चतूर, गृहिणी
कोणते संकट कधी येईल सांगता येत नाही. आताही कोरोनाचे संकट आले आणि अनेक धडे त्याने दिले. खर्चात कपात करणे हेच महत्त्वाचे आहे.
- गायत्री काळे, गृहिणी
कपडे, मोबाइल आणि वाहन यावर बराच खर्च होत असतो. हा खर्च कमी करण्यास कोरोना काळात मुलांसह स्वत:च्या सुरक्षेसाठी बाहेरचे खानपान कमी झाल्याने बचतही झाली.
- सीमा जैन, गृहिणी