कोरोनापासून बचावासाठी अत्यावश्यक: बाळही सुरक्षित, तज्ज्ञांचे मत
स्टार : ८८७
जळगाव: कोरोना प्रतिबंधक लसीकरणातून सुरुवातीला गरोदर महिलांना वगळण्यात आले होते, मात्र आता नवीन निकषांनुसार गरोदर महिलाही कोरोनाची प्रतिबंधक लस घेऊ शकणार आहे. ही लस घेतल्यानंतर महिला अधिक सुरक्षित होणार असून बाळालाही यातून सुरक्षा मिळेल, असं मत स्त्री रोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाला थोपविण्यासाठी सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. जिल्ह्यातही लस उपलब्ध झाल्यानंतर वेगाने लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, महिला व पुरुष असे विभाजन केले असता लसीकरणात अद्यापही महिलांचे प्रमाण कमी आहे. महिलांनी आता गैरसमज दूर करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३५०पेक्षा अधिक लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. दिवसाला आता ३० हजारांपेक्षा अधिक लसीकरण होत आहे. लसींचा पुरवठा मात्र कमी प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला विदेशात गरोदर व स्तनदा माता यांनाही लसीकरण केले जात जाते, आपल्याकडे मात्र या गटात लसीकरण केले जात नव्हते, काही कालावधीनंतर गरोदर महिलांनाही लस दिली जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते, त्यानुसार नवीन नियमावली आली असून गरोदर महिलाही आता कोरोना प्रतिबंधक लस घेऊ शकणार आहेत.
धोका होईल कमी
दुसऱ्या लाटेत महिलांच्या मृत्यूचे प्रमाणही अधिक होते. त्यामुळे आता लसीकरण लरून घेणे महत्त्वाचे आहे. गरोदर महिलांनी लस घेतल्यानंतर त्यांच्या बाळालाही अँटिबॉडीज मिळतील व तेही सुरक्षित राहील, शिवाय स्तनदा मातांनी लस घेतल्यानंतर बाळाला दुधाच्या माध्यमातून अँटिबॉडीज मिळतील तेव्हा महिलांनी लस घेणे गरजेचे असल्याचे, डॉ. संजय बनसोडे यांनी म्हटले आहे.
कोट
महिलांनी नि:संकोचपणे कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, कुठलीही शंका मनात ठेवू नये, लस घेतल्यानंतर सामान्यपणे होणारा ताप, अंगदुखी हा त्रास होऊ शकतो, मात्र यात बाळाला कुठलाही धोका नाही, कोरोनापासून स्वतः व बाळाला सुरक्षित करण्यासाठी महिलांनी लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. संजय बनसोडे, स्त्रीरोग विभागप्रमुख
कोट
गरोदर महिलांनाही कोरोनाप्रतिबंधक लस घेता येणार आहे. लसीकरणाबाबत कुठलीही भीती मनात न ठेवता लास घ्यावी याने कोरोनापासून बचाव होतो.
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
काय काळजी घ्यावी...
- गरोदर महिलांनी मनात कुठलीही शंका किंवा भीती ठेवू नये, न घाबरता लस घ्यावी.
- सामान्य व्यक्तींनी लसीकरण केंद्रावर गर्दी टाळणे, हात नाकातोंडाला न लावणे, मास्क व्यवस्थित परिधान करणे या बाबी कटाक्षाने पाळाव्यात.
- लस घेतल्यानंतरही हे नियम पाळावेच, शिवाय जे काही उपचार सुरू आहेत ते नियमित सुरु ठेवावे.
- पौष्टिक आहार आणि डॉक्टरांनी सांगितलेली जीवनशैलीच पाळावी.
पुरुष - ४,४०,५२५
महिला - ३,७२,६७४
एकूण पहिला डोस ७,४७,८६४
एकूण दुसरा डोस - १,६५,५१०
आतापर्यंत झालेले लसीकरण १७.३० टक्के