कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम आता समोर येत आहेत. गेल्यावर्षी ज्याप्रमाणे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास प्रशासनाला यश आले आतादेखील कोरोनाच्या संकटावर मात करण्यामध्ये यश आले आहे. कोरोना पूर्णपणे गेला असे नाही, मात्र दररोजची रुग्णसंख्या १५ ते २० टक्क्यांवर येण्यासह मृत्यूचे प्रमाण व बाधित रुग्णांची संख्यादेखील घटली आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांचे हे फळ म्हणावे लागेल; मात्र आता प्रशासनापुढे पुन्हा दुसरे संकट म्युकरमायकोसिसच्या रुपाने उभे राहिले आहे. या सोबतच लसीचा तुटवडा हा मुद्दादेखील महत्त्वाचा ठरत असून येणाऱ्या लसींमध्ये प्रशासनाला नियोजन करावे लागत आहे.
एप्रिल महिन्यात एका दिवसात १२००च्या पुढे कोरोनाची रुग्णसंख्या गेली व जिल्ह्यात पुन्हा एकदा संकट उभे राहिले. या काळात बेड उपलब्ध न होणे, ऑक्सिजन न मिळणे, व्हेंटिलेटरचा तुटवडा, रेमडेसिविरसाठी पळापळ यामुळे जिल्हावासीयांची चांगलीच दमछाक झाली. यामध्ये प्रशासनाला ऑक्सिजन असो की रेमडेसिविरसाठी नियोजन करीत ते प्रशासनाच्या नियंत्रणाखालीच वितरित केले जाऊ लागले. हे सर्व करीत असताना गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगवेगळे निर्बंध लावण्यात आले; मात्र यात गर्दी पाहिजे त्या प्रमाणात कमी झाली नाही. त्यामुळे मे महिन्याच्या मध्यापासून निर्बंध अधिक कडक करण्यात आले. यात कारवाईदेखील वाढली व नागरिक बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले. या सर्व उपाययोजनांचे परिणाम समोर येऊन आता दररोजची रुग्णसंख्या २०० खाली आली आहे. कोरोनावर तर नियंत्रण मिळविले, मात्र त्या पाठोपाठ आता म्युकरमायकोसिसने डोके वर काढल्याने त्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये या आजारावर आवश्यक असलेल्या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने त्याची माहिती प्रशासनाला देण्याचे निर्देश देण्यात आले व त्याच्या पुरवठ्यासाठीही सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू असून या रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे हे आव्हान असताना जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस येत नसल्याने त्यासाठीही कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा सलग दोन-दोन दिवस लसीकरण बंद राहते. लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्य शासनाने फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले; मात्र ४५ वर्षांवरील नागरिकांना देखील पुरणार नाही इतके कमी डोस जिल्ह्याला मिळतात. लसीचा तुटवडा असाच राहिला तर पूर्ण लसीकरण कधी होणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला. आता हळूहळू लसीकरणात सातत्य येत असले तरी भविष्यात ते कायम रहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.