CoronaVirus News: एचआरसीटी स्कोअर २१ असतानाही ६२ वर्षीय महिलेची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 07:48 AM2021-05-30T07:48:51+5:302021-05-30T07:49:31+5:30
रेमडेसिविर न घेता प्रकृती ठणठणीत
भडगाव (जळगाव) : ऑक्सिजन पातळी ३०पर्यंत खालावलेली त्यात एचआरसीटी स्कोअर २१ असतानाही रेमडेसिविर न घेता केवळ सकारात्मक विचार व आत्मविश्वासाच्या जोरावर ६२ वर्षीय महिलेने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्या केवळ १२ दिवसांत कोरोनातून बऱ्या झाल्याने त्यांचे आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक होत आहे.
तालुक्यातील सावदे येथील रहिवासी मालतीबाई काळू भिल्ल (६२) या मधुमेह असलेल्या महिलेस १६ मे रोजी बरे वाटत नव्हते. त्यांना तत्काळ भडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी त्यांची ऑक्सिजन लेव्हल ५४, एचआरसीटी स्कोअर २१ होता. उपचारादरम्यान ऑक्सिजन पातळी खालावत चालल्याने सर्वच घाबरले होते. मात्र येथील डॉक्टरांनी महिलेला धीर देत उपचार सुरू केले. या उपचाराला मालतीबाई सकारात्मक प्रतिसाद देत होत्या. ‘दादा, मला लवकर बरे होऊन घरी जायचे’, असे त्या डॉक्टरांना सांगत होत्या.
‘आजी, तुम्ही लवकरच बऱ्या होत आहात’, असे सांगून डाॅक्टर धीर देत हाेते. बघता बघता ऑक्सिजन पातळी धोक्याच्या पातळीवर असलेल्या मालतीबाई यांची प्रकृती सुधारण्यास सुरुवात झाली आणि केवळ १२ दिवसांत एकही रेमडेसिविर डोस न घेता त्या बऱ्या झाल्या. मालताबाई यांनी कोरोनावर मात करीत घर गाठले आहे.
मालतीबाई भिल्ल यांची कोरोनाने प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यांची ऑक्सिजन लेव्हल ३० होती. स्कोअरही २१ होता. मधुमेह असलेल्या या रुग्णावर खबरदारी घेत उपचार करण्यात आले. त्याला रुग्णाने चांगला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्या ठणठणीत होण्यास मदत झाली.
- डॉ. पंकज जाधव,
वैद्यकीय अधिकारी, भडगाव