CoronaVirus News: दारू मिळाली नाही म्हणून बियर शॉपीवर बाटल्या फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 01:46 PM2020-05-10T13:46:20+5:302020-05-10T13:46:32+5:30
हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून, भूषण सोनवणे उर्फ अठ्ठा, आकाश व आणखी एक अशा तिघांविरुद्ध शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
जळगाव : लॉकडाऊनमुळे दिलेल्या निर्धारित वेळेत बियर शॉपी बंद केल्यानंतर बियर न मिळाल्याने टवाळखोरांनी शॉपीतीलच रिकाम्या बियर बाटल्या उचलून त्या दुकानावर फोडल्याची घटना शनिवारी सायंकाळी सात वाजता कानळदा रस्त्यावर घडली. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून, भूषण सोनवणे उर्फ अठ्ठा, आकाश व आणखी एक अशा तिघांविरुद्ध शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
कानळदा रस्त्यावर राधारमन अपार्टमेंटमध्ये योगेश गोपाळ साळी (३१, रा.हरीओम नगर) यांच्या मालकीची खुशी बियर शॉपी नावाचे दुकान आहे. लॉकडाऊन काळात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेतच मद्याची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. त्यामुळे साळी यांनी शनिवारी ठरलेल्या वेळेत दुकान बंद केले. त्यानंतर सायंकाळी सात वाजता भूषण सोनवणे उर्फ अठ्ठा, आकाश व आणखी एक तरुण असे तिघं जण तेथे आले.
दुकान बंद आढळल्याने त्याने रस्त्यावर रिकामी पडलेली बियरची बाटली उचलून दुकानाच्या लोखंडी जाळीवर फोडली. अर्वाच्च भाषेत दुकान मालकाला शिवीगाळ करीत दुकानातीलच रिकाम्या दोन बाटल्या घेऊन त्या जाळीवर फोडल्या. हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. योगेश साळी यांनी फुटेज पाहून शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. सोबत फुटेजही सादर केले.