मनपाचे अंदाजपत्रक आज होणार सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:18 AM2021-02-25T04:18:25+5:302021-02-25T04:18:25+5:30

कोणतीही करवाढ यंदा नाहीच ? : उत्पन्न वाढीसाठी होणार प्रयत्न ; लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - महानगरपालिकेत २०२१-२२ या ...

Corporation's budget will be presented today | मनपाचे अंदाजपत्रक आज होणार सादर

मनपाचे अंदाजपत्रक आज होणार सादर

googlenewsNext

कोणतीही करवाढ यंदा नाहीच ? : उत्पन्न वाढीसाठी होणार प्रयत्न ;

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - महानगरपालिकेत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी सादर करणार आहेत. गेल्या वर्षभरात कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच पुन्हा वाढणारे रुग्ण याचा परिणाम मनपाच्या अंदाजपत्रकावर दिसून येणार असून, यंदा प्रशासनाकडून कोणतीही करवाढ होण्याची शक्यता नाही. यंदा फुगवटा नसलेले अंदाजपत्रक मनपा प्रशासनाकडून सादर होण्याची शक्यता असून, मनपाचे उत्पन्न वाढण्याबाबत विशेष तरतूद प्रशासनाकडून केली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी महासभेने १२०० कोटींचा बजेट मंजूर केला होता. यंदादेखील फुगवटा नसलेले अंदाजपत्रक सादर करण्याची तयारी प्रशासनाकडून चालवली आहे. सकाळी ११ वाजता मनपा आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर केल्यानंतर स्थायी समिती सदस्यांचा अंदाजपत्रकाच्या अभ्यासासाठी ही सभा तहकूब केली जाणार असून, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील व सदस्य काही बदल सुचवतील, त्यानंतर विशेष सभेचे आयोजन करून, सभापती यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान, अंदाजपत्रकाची सभा संपल्यानंतर स्थायी समितीची नियमित सभा सकाळी ११.३० वाजता सभागृहात होणार असून, या सभेत एकूण ६ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

रस्त्यांसाठी विशेष तरतुद होणार

यंदाच्या अर्थसंकल्पात मनपाकडून शहरातील रस्त्यांसाठी विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. शहरातील रस्त्यांची समस्या बिकट झाली असून, रस्त्यांच्या समस्येने त्रस्त असलेल्या जळगावकरांच्या मनात सत्ताधारी व प्रशासनाविरोधात तीव्र संताप आहे. हाच संताप दूर करण्यासाठी मनपाच्या यंदाच्या अंदाजपत्रकात नवीन रस्त्यांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी दिली आहे.

हॉकर्सच्या शुल्कात वाढ होण्याची शक्यता

प्रशासनाने गेल्या वर्षी सादर केलेल्या अंदाजपत्रकात हॉकर्सकडून घेण्यात येणाऱ्या दैनंदिन वसुली शुल्कात २० वरून ५० रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र तत्कालीन स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा यांनी हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. हॉकर्सवरील शुल्क २० रुपये इतकेच ठेवण्यात आले होते; मात्र यंदा मनपाकडून उत्पन्न वाढीसाठी पुन्हा यंदाच्या अंदाजपत्रकात हॉकर्सच्या शुल्कात वाढ करण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांना दिलासा राहणार असला तरी हॉकर्सला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

Web Title: Corporation's budget will be presented today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.