गाळेकारवाई पेक्षा वसुलीवर मनपाचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:17 AM2021-07-30T04:17:16+5:302021-07-30T04:17:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनपाची प्रक्रिया सुरु आहे. मे महिन्यात ठराव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनपाची प्रक्रिया सुरु आहे. मे महिन्यात ठराव केल्यानंतर आता मनपा प्रशासनाने गाळे कारवाई करण्यापेक्षा वसुलीवर जास्त भर दिला आहे. यासाठी मनपा प्रशासनाने प्रशांत पाटील व संतोष वाहुळे या दोन्ही उपायुक्तांवर जबाबदारी सोपविली आहे. यासाठी लवकरच मनपाकडून धोरण निश्चित केले जाणार असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे.
गेल्या ९ वर्षांपासून गाळेधारकांचा प्रश्न प्रलंबित असून, यामुळे मनपाच्या उत्पन्नांवर मोठा परिणाम होत आहे. महासभेत ज्या गाळेधारकांनी थकीत भाडे भरले नाही अशा गाळेधारकांवर कारवाई करून, गाळे जप्त करण्याचा ठराव करण्यात आला होता. आता नुतनीकरणासाठी पात्र ठरणाऱ्या गाळेधारकांची सुनावणी प्रक्रिया घेण्याची तयारी मनपाकडून सुरु करण्यात आली आहे. यासाठी सप्टेंबर २०१९ मध्ये शासनाने बदल केलेल्या अधिनियमातील तरतूदीप्रमाणे नुतनीकरणासाठीच्या पात्रता गाळेधारकांनाच सिध्द कराव्या लागणार आहेत. यासाठी मनपाकडून १५ दिवसांची मुदत देखील दिली जाणार आहे.
आधी वसुलीवर भर, नाही झाल्यास जप्ती
मनपा प्रशासनाकडून आधी भाडे थकीत असलेल्या गाळेधारकांकडून भाडे वसुल करण्यावर भर दिला जाणार आहे. मनपाने सर्वच गाळेधारकांना नुकसान भरपाईच्या नोटीसा बजविल्या आहेत. तसेच ही रक्कम भरण्यासाठी आता विशेष मुदत देखील गाळेधारकांना दिली जाणार आहे. मात्र, या मुदतीत गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम न भरल्यास मनपाकडून गाळे सील करून, ते जप्त करण्याची प्रक्रिया मनपाकडून करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या सुत्रांनी दिली आहे.
गाळेधारक मात्र नगरविकास मंत्र्यांचा आश्वासनावर आस लावून
एकीकडे मनपा प्रशासाकडून टप्प्याटप्यात वसुली व कारवाईसाठी हालचाली सुरु असताना, दुसरीकडे गाळेधारक मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून आहेत. नगरविकास मंत्र्यांनी मुंबईत गाळेधारकांची बैठक घेवून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन देवून १५ दिवस झाले असतानाही नगरविकास मंत्र्यांकडून कोणताही निरोप आलेला नाही.