नऊ महिन्यांनंतर मनपाचे कोविड केअर सेंटर अखेर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:46 AM2021-01-08T04:46:01+5:302021-01-08T04:46:01+5:30
जिल्हा रुग्णालयात होणार उपचार : रुग्ण वाढल्यास पुन्हा सेंटर सुरू करणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपा ...
जिल्हा रुग्णालयात होणार उपचार : रुग्ण वाढल्यास पुन्हा सेंटर सुरू करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने मार्च महिन्यात कोरोनाबाधितांचे विलगीकरणासाठी शहरात सात ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले होते. मात्र, गेल्या महिनाभरापासून रुग्णांमध्ये मोठी घट होत असल्याने व आजारावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील आता वाढत असल्याने ठराविकच रुग्णच शिल्लक आहेत. यामुळे मनपा प्रशासनाने शहरातील कोविड केअर सेंटर अखेर नऊ महिन्यांनंतर बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली. मात्र रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा सेंटर सुरू करण्याची तयारी असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
कोरोनाचे संकट आल्यानंतर शहरात एप्रिल व मे महिन्यात रुग्णांची संख्या कमी होती. मात्र, त्यानंतर जून महिन्यात रुग्णांची संख्या वाढल्यानंतर कमी लक्षण असलेले रुग्ण व संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासह अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू होते. मात्र, आता शहरात २३२ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यापैकी सात ते आठ रुग्ण मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे सात ते आठ रुग्णांसाठी संपूर्ण केअर सेंटर सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे मनपाने कोविड केअर अखेर बंद करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा शासकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून रुग्ण हलविण्यात आले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.