विसर्जनस्थळी पोलिसाला दाम्पत्याकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:18 AM2021-09-21T04:18:37+5:302021-09-21T04:18:37+5:30
जळगाव : प्रवेशबंदी केलेल्या ठिकाणी गणपती मूर्तीस विसर्जन करण्यास मनाई करणाऱ्या योगेश मधुकर ठाकूर या पोलीस अंमलदाराची कॉलर पकडून ...
जळगाव : प्रवेशबंदी केलेल्या ठिकाणी गणपती मूर्तीस विसर्जन करण्यास मनाई करणाऱ्या योगेश मधुकर ठाकूर या पोलीस अंमलदाराची कॉलर पकडून मारहाण झाल्याची घटना रविवारी सायंकाळी मेहरुण तलाव परिसरात घडली. दरम्यान, याप्रकरणी राजेंद्र सोनाजी वाजपेयी व त्यांची पत्नी एकता (रा.वाघ नगर) या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यासह दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.
अनंत चतुर्दशीला मेहरुण तलावावर सार्वजनिक व खासगी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. लेक रेसिडेन्सीजवळ विसर्जनासाठी जाणाऱ्या नागरिकांनाही प्रवेश नाकारण्यात येऊन या ठिकाणी बॅरिकेड्स उभे करून रस्ता बंद करण्यात आला होता. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल योगेश मधुकर ठाकूर तसेच नागपूर महामार्गाचे दिनेश सुरेश माकरवार या दोन जणांना बंदोबस्तावर तैनात करण्यात आले. सायंकाळी राजेंद्र सोनाजी वाजपेयी हे पत्नी एकता वाजपेयी यांच्यासोबत दुचाकीने (क्रमांक एम.एच.१९ डी.आर. ७०२३) येऊन त्यांनी बॅरिकेड्स बाजूला करून तेथून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यावर योगेश ठाकूर यांनी वाजपेयी दाम्पत्याला या ठिकाणाहून रस्ता बंद आहे, तुम्ही पुढील रस्त्याने जा असे सांगितले. याचा राग आल्याने राजेंद्र वाजपेयी यांनी योगेश ठाकूर या कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. कॉलर पकडून त्याच्या छातीत बुक्का मारला व शिवीगाळ करत चापटा, बुक्क्यांनी मारहाण केली. पत्नी एकता या तर पायातील चप्पल काढून पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धाऊन आल्या. दोघेही ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नसल्याने पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत दाम्पत्याला ताब्यात घेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले. योगेश ठाकूर यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र वाजपेयी व एकता वाजपेयी या दाम्पत्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना रात्रीच अटक करण्यात आली.