जळगाव : शहरातील महापालिकेच्या केंद्राला कोविशिल्डचा मर्यादित पुरवठा झाल्यामुळे रविवारीच ही लस संपली असून कोविशिल्ड लसीची महापालिकेची सर्व केंद्र सोमवारी बंद राहणार आहेत. केवळ चेतनदास मेहता रुग्णालयात कोव्हॅक्सिन उपलब्ध राहणार आहे. तसेच रेडक्राॅसच्या केंद्रावर कोविशिल्ड लस १८ वर्षांवरील नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे.
कोव्हॅक्सिनचा १८ पुढील सर्व वयोगटासाठी केवळ दुसरा डोस उपलब्ध आहे. यात ५० टक्के ऑनलाइन तर ५० टक्के ऑफलाइन अशी सुविधा आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रांवर पुरेसा साठा शिल्लक राहत नसल्याने लसींअभावी केंद्र बंद राहत आहेत. गेल्या आठवड्यात चार ते पाच दिवस केंद्र बंद होती. त्यातच रविवारी एक केंद्र सुरू झाल्यानंतर आता सोमवारी पुन्हा सर्व केंद्र बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील आदिवासी भागात अधिक लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.
गरोदर महिलांचे समूपदेशन
गरोदर महिला व स्तनदा माता यांचेही कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. यात या महिला व मातांचे समूपदेशन करून त्यांच्या संमतीनेच हे लसीकरण केले जाणार आहे. नुकताच केंद्राकडून या गटातही लसीकरणाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातही तो लागू करण्यात आला आहे. दरम्यान, यासह आता दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना केंद्रावर जाण्यासाठी त्रास होत असल्याने या नागरिकांच्या अगदी घराजवळ लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना स्थानिक प्रशासनाला प्राप्त झालेल्या आहेत.