आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह दिडशे जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 06:02 PM2021-02-20T18:02:09+5:302021-02-20T18:02:51+5:30
आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शंभर ते दिडशे जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने शहरात मिरवणुकीचे आयोजन करून शासन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शंभर ते दिडशे जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमित्ताने पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड,पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील, पोलीस नाईक सुभाष घोडेस्वार व पंढरीनाथ पवार हे सरकारी वाहनांमधून शहरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना रेल्वे स्टेशन चौक ते सिग्नल चौक या मार्गावर साडे सात वाजेच्या सुमारास शंभर ते दिडशे लोकांच्या उपस्थितीत मिरवणुक काढण्यात आली.
पोलीस नाईक पंढरीनाथ पवार यांच्या फिर्यादीवरून आमदार मंगेश चव्हाण, सौरभ अशोक पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक चिरागूद्दीन रफीकोद्दीन शेख, दिपकसिंग ईश्वरसिंग राजपूत, बबन पवार, कैलास पाटील, नगरसेवक नितीन रमेश पाटील, कल्पेश पाटील, करण राजपूत, अनिकेत गवळी, भागवत बाळू पाटील, पंकज बाळासाहेब पाटील, प्रमोद वाघ, दर्शन बापूसाहेब शिंदे, शुभम पाटील, कुणाल जगन्नाथ पाटील, योगेश राजेंद्र कुमावत यांच्यासह इतर शंभर ते दिडशे लोकांच्या विरुद्ध भादंवि कलम १८८, २६९, २७०सह साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम २,३, ४ व महाराष्ट्र कोव्हीड-१९ अपाययोजना नियम २०२०चे नियम ११ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००६चे उल्लंघन ५१(ब) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन कलम १३५प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे करीत आहे.
दरम्यान, शिवाजी महाराज यांचे जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक, मोटारसायकल रॅली काढू नये याबाबत नोटीसा काढण्यात आल्या होत्या शिवाय शांतता समिती बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या.