नंदुरबार :स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व विसरवाडी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने बिजगाव-बिजादेवी परिसरात टाकलेल्या धाडीत पोलिसांनी ९७ हजार ८00 रुपयांची गावठी दारू जप्त केली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध धंद्यावर कारवाईची मोहीम जिल्ह्यात सुरू आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पथक तयार केले आहे. विसरवाडी परिसरातील बिजगाव-बिजादेवी परिसरात अवैध गावठी दारूचे उत्पादन आणि विक्री मोठय़ा प्रमाणावर होत असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक गिरीश पाटील, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सपकाळे यांच्या पथकाने सोमवारी पहाटे सहा वाजता अचानक छापा टाकला. त्यावेळी सहा जणांकडे सुमारे ९७ हजार ८00 रुपयांची अवैध दारू मिळून आली. ती सर्व दारू जप्त करून मौजू मौल्या वळवी, कृष्णा काल्या पाडवी, विजयसिंग गोविंद गावीत, गोविंद सुरका देसाई, जालमसिंग हिरजी गावीत, मालाबाई कालू गावीत सर्व रा.बिजगाव, ता.नवापूर यांच्याविरुद्ध वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.दुसर्या एका कारवाईत एलसीबीनेच लक्कडकोट येथे छापा टाकला. रवी रविदास सकट, रा.देवळफळी, ता.नवापूर याच्याकडे देशी, विदेशी बिअर आढळल्या. त्याची किंमत २३हजार ६८0रुपये इतकी आहे. त्याच्यावरही नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिजगावात ९८ हजारांची गावठी दारू जप्त सहा जणांवर गुन्हा : एलसीबीची कारवाई
By admin | Published: June 02, 2015 4:54 PM