लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने तालुक्यातील २८ गावांना याचा तडाखा बसला असून १८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. याची झळ एक हजार सहाशे शेतकऱ्यांना पोहचली आहे. सोमवारी सायंकाळी पुन्हा अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह सलामी दिल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. शहरातील अनेक भागात विजेची बत्तीगूल झाली होती.
शनिवारी अवकाळी माऱ्यासह गारपीटीने नुकसान झालेल्या शेती क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले होते. त्यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन शेतक-यांना धीरही दिला होता. रविवारी व सोमवारीही महसुल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या २८ गावांमधील शेती पिकांची पाहणी करुन पंचनामे केले. पंचनामे करण्याचे काम सुरुच राहिल. अशी माहिती कृषी अधिकारी साठे यांनी दिली.
अवकाळी धूमशान सुरुच, शेतकरी धास्तावले
शनिवारी अवकाळी पावसाने परिसराला झोडपल्याने मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी पिकांसह फळबागांचेही अतोनात नुकसान झाले आहे. गारपीट झाल्याने फळबागांचा फुलोरा गळून पडला. वादळीवा-याने पिके आडवी पडली असून केळी बांगांबरोबरच कांदा पिकालाही झळ पोहचली आहे. सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजता परिसरातील मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसाचे हे धूमशान शेतक-यांची चिंता वाढविणारे ठरले आहे.